सावधान, सातबारावर उगवताहेत शर्तीचे शेरे

Farmer
Farmer

बारामती : आतापर्यंत ललाटी नसलेले तलाठी लिहितो अशी शेतकऱ्यांची धारणा होती. आता बारामती तालुक्‍यातील सावळ येथील सातबारा पाहिला तर तलाठी नव्हे तर "ऑनलाइन' यंत्रणा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नसलेल्या अटीशर्ती मांडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सावळमध्ये प्लॉटधारकास त्याच्या सातबारावर अचानकच कुळकायदा दिसल्याने हा शेतकरी हादरला.

सावळ येथे भालचंद्र लोणकर या काऱ्हाटी येथील शेतकऱ्याने एक बिगरशेती प्लॉट खरेदी केला. प्लॉटवर कोणतीही अट, शर्त नसल्याने लोणकर यांना प्लॉट खरेदी करता आला. त्यानंतर त्यांनी 30 नोव्हेंबर 2018 रोजी एक ऑनलाईन सातबारा तलाठ्याच्या स्वाक्षरीने काढला. तेव्हाही त्यावर शर्त नव्हती. मात्र, 13 मे 2019 रोजी जेव्हा लोणकर यांनी त्या प्लॉटचा नव्याने ऑनलाइन सातबारा काढला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण या सातबारा उताऱ्यावर "कुळकायदा कलम 63 अ -1 या तरतुदीस अधीन राहून खरेदी-विक्रीस प्रतिबंध' असा शेरा पडला आहे. अचानक उगवलेल्या शेऱ्यामुळे लोणकर यांच्या पायाखालची वाळूच सरकली. आता लोणकर यांना ही शर्त काढण्यासाठी महसूल खात्याचेच उंबरे झिजवावे लागतील व महसूल कर्मचाऱ्यांना विनंती करून ही शर्त उठवावी लागेल. स्वतःचा काहीही दोष नसताना या शेतकऱ्यास पायपीट करावी लागेल.

पै-पै जमवून व कष्टातून एखादी मिळकत खरेदी केल्यानंतर महसूल खात्याच्या चुकीच्या एका शेऱ्यामुळे त्या मिळकतीचे वाटोळे होते याचा अनुभव देणारी व सामान्य शेतकऱ्याचा संताप वाढविणारी ही घटना आहे. एकंदरीत ऑनलाइन सातबाराने शेतकऱ्यांचे दुःख हलके करायच्या ऐवजी आणखीच चिंतामय केले आहे. तलाठी लवकर भेटत नाही, म्हणून ऑनलाइन बरे म्हणावे तर ऑनलाइन यंत्रणा अगोदर नसलेल्या शर्ती सातबाऱ्यावर उमटवू लागल्याने शेतकऱ्यांना भीक नको, कुत्रे आवर म्हणण्याची वेळ येईल. संबंधित तलाठ्यांना हस्तलिखित व संगणकीकृत दस्तऐवज तपासून आवश्‍यकतेप्रमाणे दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे, असे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले.

सन 2015-16च्या दरम्यान सातबाराचे संगणकीकरण सुरू होताना नकळत झालेल्या चुका असण्याची शक्‍यता आहे. कलम 155 नुसार त्याची दुरुस्तीची कार्यवाही करावी लागेल.
प्रदीप चोरमले, तलाठी, जळोची

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com