ऑनलाइन औषध विक्री हानीकारक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

पुणे - आरोग्य क्षेत्रात होत असलेली ऑनलाइन औषध विक्री रुग्णांच्या आरोग्यास हानीकारक आहे. मान्यताप्राप्त डॉक्‍टरांमार्फत औषधे दिली आहेत का?, याची तपासणी करण्याची कोणतीही यंत्रणा ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्यांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना चुकीची औषधे दिली जाण्याचा धोका असल्याचे मत ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 

‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष सुशील शहा, सचिव अनिल बेलकर, राहुल दर्डा, सुरेश बाफना, संतोष खिंवसरा, प्रवीण मुथा, रवींद्र पवार, प्रदीप कावेडिया, संजय शहा, महेंद्र पितळिया, चेतन शहा, रोहित जोशी, शशिकांत डांगी, रामचंद्र गायकवाड, रोहित करपे, राहुल देशपांडे, नंदकुमार सांडभोर उपस्थित होते. 

ऑनलाइन औषधविक्रीबाबत देशात कोणताही कायदा नाही. ही विक्री बेकायदेशीर असून येथील सामाजिक आरोग्यास घातक आहे. केवळ डॉक्‍टरांच्या चिठ्ठीनेच घेणे आवश्‍यक असलेली औषधे कोणाच्याही हाती पडू शकतात. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका पोचू शकतो, अशी भीतीही या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

जेनेरिक औषधे डॉक्‍टरांनी रुग्णांना लिहून द्यावीत, अशी सूचना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र, त्या औषधांतील गुणधर्म असलेली इतर पर्यायी औषधे देण्याची परवानगी केमिस्टना मिळावी. त्यासाठी कायद्यात बदल केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

जीएसटीचा परतावा ही प्रक्रिया किचकट आहे. विक्रेत्यांकडून परतावा घेतला जात नाही. त्यांना नुकसानीस सामोरे जावे लागते. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ करावी. तसेच ई-वे बिलांमुळे जीवनावश्‍यक औषधे तत्काळ रुग्णांना उपलब्ध करून देणे शक्‍य होत नाही.  त्यामुळे ही सक्ती रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.संघटनेतर्फे वारी दरम्यान वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान, डायबेटिस-एड्‌स यांसारख्या विविध आजारांवर जनजागृती, मोफत आरोग्य तपासणी आदी उपक्रमांविषयी या वेळी माहिती दिली.

केमिस्टची संख्या 
पुणे शहर - ३५००
पिंपरी-चिंचवड - १५००
जिल्ह्याचा ग्रामीण भाग - ३०००
पुण्यातील औषधांची उलाढाल  -    ४००० कोटी

Web Title: Online drug sales are harmful