शिक्षक भरती होणार "पवित्र' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पुणे - बनावट शिक्षक मान्यतेपेक्षाही शिक्षक भरती आणि त्यासाठी होणारा सौदा हा अधिक चर्चेचा विषय. हा सौदा बंद करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पावले टाकली आहेत. आता "पवित्र' प्रणालीद्वारे शिक्षकांच्या भरतीसाठी "ऑनलाइन' परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी तयार होईल. त्यातून शिक्षण संस्थाचालकांना शिक्षक निवडता येतील. 

पुणे - बनावट शिक्षक मान्यतेपेक्षाही शिक्षक भरती आणि त्यासाठी होणारा सौदा हा अधिक चर्चेचा विषय. हा सौदा बंद करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पावले टाकली आहेत. आता "पवित्र' प्रणालीद्वारे शिक्षकांच्या भरतीसाठी "ऑनलाइन' परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी तयार होईल. त्यातून शिक्षण संस्थाचालकांना शिक्षक निवडता येतील. 

शिक्षक भरतीसाठी संस्थाचालकांना द्याव्या लागणाऱ्या रकमेचे आकडे काही लाखांच्या घरात असतात, अशी चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक दर्जाचादेखील प्रश्‍न निर्माण होतो. शाळांना दर्जेदारच शिक्षक मिळावेत, भरतीतील गैरप्रकार बंद व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामांच्या प्राधान्यक्रमात केंद्रीय शिक्षक भरती हा विषय घेतला होता. 

वर्षभरात येणार "पवित्र' 
राज्य सरकारने दोन वर्षे पूर्ण केली; परंतु केंद्रीय भरती प्रणाली अस्तित्वात आली नाही. मात्र, त्याचा एक भाग म्हणून शिक्षण आयुक्तालयाने ऑनलाइन परीक्षा घेण्यासंबंधी प्रक्रिया सुरू केली आहे. परीक्षेसाठी संगणक प्रणाली तयार करण्याबाबत "एनआयसी' या सरकारी संस्थेबरोबर चर्चाही झाली आहे. या प्रणालीस "पवित्र' असे नाव दिलेले आहे. यामार्फत शिक्षक होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परीक्षा होतील. वर्षभरात ही प्रणाली विकसित होईल, असे शिक्षण आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

"एमईपीएस'मध्ये बदल 
महाराष्ट्र खासगी शाळा सेवाशर्ती अधिनियम 1977 (एमईपीएस) हा कायदा सेवाशर्तीबद्दल होता. या कायद्यात शाळांची मान्यता कशी द्यायची, शाळा बंद करण्याची प्रक्रिया कशी करायची, प्रशासक नियुक्ती, शिक्षण आयुक्‍तांचे अधिकार आदीबाबत काहीच नव्हते. गेल्या चाळीस वर्षांत शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल झाले. शिक्षण आयुक्त हे पद नव्याने अस्तित्वात आले. शालार्थ प्रणाली सुरू झाली, ऑनलाइन मान्यता सुरू होत आहे. यांची एकत्रित नियमावली नव्हती. त्यामुळे एमईपीएस कायदा आणि नियमावलीत बदल केला जाणार आहे. त्यासंबंधी शिक्षण आयुक्तांनी दोन बैठकादेखील घेतल्या आहेत. 

शिक्षकांची निवड गुणवत्ता यादीतून 
शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्‍तीची आहे. त्यानंतरही सीईटी घेतली जात होती. परंतु, आता टीईटीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना "पवित्र' प्रणालीद्वारे परीक्षा देता येईल. या परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा होऊ शकतात. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी शिक्षण खात्यामार्फत उपलब्ध करून दिली जाईल, त्यातून शिक्षकांची निवड करावी लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Online exam system for teachers recruitment