ऑनलाइन ठगांचे  ‘फास्टॅग’ लक्ष्य

पांडुरंग सरोदे
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये फास्टॅगला सुरुवात झाली आहे. टोल नाक्‍यावर फास्टॅग आवश्‍यक असल्याने सध्या वाहनचालकांकडून विविध प्रकारचे ॲप, वेबसाइट व लिंकचा वापर करून फास्टॅग काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पुणे - विविध प्रकारच्या ऑनलाइन सेवांच्या माध्यमातून नागरिकांना फसविण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामध्ये सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घातला जात आहे. हे चित्र कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यातच आता सायबर गुन्हेगारांनी टोलसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फास्टॅग’कडे आपला मोर्चा वळवला आहे. ‘फास्टॅग वॉलेट बनवून देतो’, ‘फास्टॅगसाठी संबंधित लिंकवर क्‍लिक करा’, ‘फास्टॅगसाठी बॅंकांशी संबंधित माहिती द्या’ अशी वेगवेगळी कारणे सांगून फसवणूक होण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील महामार्गांवरील वाहनचालकांना टोल देण्यामध्ये सुसूत्रता यावी, यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते व परिवहन मंत्रालयाने १५ डिसेंबर २०१९ पासून देशभरात इलेक्‍ट्रॉनिक टोल गोळा करणाऱ्या ‘फास्टॅग’ची घोषणा केली. त्यानुसार महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये फास्टॅगला सुरुवात झाली आहे. टोल नाक्‍यावर फास्टॅग आवश्‍यक असल्याने सध्या वाहनचालकांकडून विविध प्रकारचे ॲप, वेबसाइट व लिंकचा वापर करून फास्टॅग काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी आता त्याकडे लक्ष वळविले आहे. वेगवेगळ्या राज्यांत फास्टॅगच्या नावाखाली फसवणूक सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, याबाबतचे  पत्र राज्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालयाद्वारे सायबर पोलिसांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

कॅशबॅक, डिस्काउिंट, स्कीम आणि बरेच काही ! 
वाहनचालकांना फास्टॅग वॉलेटची नोंदणी करून देण्यासाठी नागरिकांना फेक मेसेज पाठविले जात आहेत. विशेषतः नागरीकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी विविध प्रकारच्या आकर्षक योजना, डिस्काउंट दिले जात आहेत; तर काही जणांकडून मोठ्या प्रमाणात कॅशबॅकची ऑफर देऊ केली जात आहे. त्यांना प्रतिसाद दिल्यानंतर लिंक, मेसेज पाठवून नागरिकांना प्रतिसाद देण्यास सांगितले जाते. त्यानंतर नागरिकांची वैयक्तिक, गोपनीय माहिती व ओटीपी क्रमांक घेतल्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम काढून घेतली जात आहे.

गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते
सायबर गुन्हेगारांकडून फास्टॅग चीपचे क्‍लोनिंग केले जाऊ शकते. त्याद्वारे नागरिकांची महतत्त्वाची गोपनीय माहिती काढून घेण्याबरोबरच त्यांची फसवणूकही होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

ओएलएक्‍स, पेटीएम, विविध प्रकारचे वॉलेट ॲप याद्वारे आत्तापर्यंत ऑनलाइन फसवणूक सुरू आहे. सायबर गुन्हेगारांनी फास्टॅग’कडेही आपले लक्ष वळविले आहे. वैयक्तिक व बॅंकांसंबंधीची गोपनीय माहिती घेऊन फसवणूक सुरू आहे.
- जयराम पायगुडे,  वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

अशी घ्या काळजी
अनोळखी व्यक्तींना फास्टॅगसाठी वैयक्तिक माहिती देऊ नका
फास्टॅग नोंदणीसाठी बॅंक, नॅशनल हायवे ऑथिरिटी किंवा अधिकृत ॲप डाउिनलोड करा
स्वस्तातील किंवा तशाच अन्य योजनांना बळी पडू नका 
बॅंक, टोल प्लाझावरील फास्टॅग प्रक्रियेस प्राधान्य द्या
अधिकृत एजन्सीमार्फतच फास्टॅग घ्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online fastag