लष्कराच्या नावाखाली ऑनलाइन गंडा

पांडुरंग सरोदे
रविवार, 7 एप्रिल 2019

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

  •   ऑनलाइन खरेदीसाठी अधिकृत संकेतस्थळालाच भेट द्या
  •   स्वस्तातील वस्तू खरेदी करताना योग्य खबरदारी घ्या
  •   ‘कॅश ऑन डिलिव्हरी’सारखा पर्याय वापरता येईल
  •   कोणत्याही प्रकारच्या भावनिक आवाहनास बळी पडू नका

पुणे - ‘बाजारात नुकताच आलेला आयफोन माझ्याकडे आहे, कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळेल. मी सध्या भारतीय लष्करामध्ये मेजरपदावर कार्यरत आहे,’ अशी जाहिरात ऑनलाइन झळकली. ‘भारतीय लष्कर’ हा शब्द पाहून विश्‍वास बसल्याने येरवड्यातील अभिजित शर्मा याने अठरा हजार रुपये ऑनलाइन भरून मोबाईलची ऑर्डर दिली. त्यानंतर अद्यापही अभिजितला मोबाईल मिळालेला नाही. लष्करी अधिकारी, जवान असल्याचे भासवून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड, वर्धा यासह राज्यातील मोठमोठ्या शहरांमध्ये सुरू आहेत.

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर पुलवामा येथे झालेला हल्ला, त्यापाठोपाठ भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये केलेला ‘एअर स्ट्राइक’ आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने केलेली सुटका, या घटनांमुळे लष्कर व जवानांबद्दल भारतीय नागरिक अधिक भावनिक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक नागरिकाच्या या भावनिक स्थितीचा वापर काही व्यक्तींकडून ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी केला जात आहे. पुण्यासह अन्य शहरांमधील नागरिकांची याच पद्धतीने सध्या फसवणूक सुरू आहे.

मोबाईल, दुचाकी, कार, महागड्या वस्तू, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू यांसारख्या विविध प्रकारच्या वस्तू ओएलएक्‍स किंवा अन्य संकेतस्थळे आणि ॲपवर दाखवून नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात येते. त्यानंतर साहिल कुमार, प्रणव दास, तेज कुमार अशा वेगवेगळ्या नावांचा वापर करून भारतीय लष्करातील अधिकारी, जवान असल्याचे सांगत नागरिकांना भावनिक साद घातली जाते. त्यानंतर पेटीएम, पे ॲप यासारख्या विविध प्रकारच्या ॲपद्वारे ऑनलाइन पैसे जमा करण्यास सांगत नागरिकांची फसवणूक करण्यात येते. राजस्थानमधील भरतपूर, दिल्ली व अन्य काही राज्यांतून हा प्रकार केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऑनलाइन खरेदीतील फसवणूक 
  २०१८ मधील घटना - ३००  
  जानेवारी ते मार्च २०१९ मधील घटना - १३५
  ऑनलाइन मोबाईलखरेदीत फसवणूक होणारा वयोगट - ३० ते ४०
  ऑनलाइन जुन्या दुचाकी, कारखरेदीत फसवणूक होणारा 
    वयोगट - ३० ते ५०

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
  ऑनलाइन खरेदीसाठी अधिकृत संकेतस्थळालाच भेट द्या
  स्वस्तातील वस्तू खरेदी करताना योग्य खबरदारी घ्या
  ‘कॅश ऑन डिलिव्हरी’सारखा पर्याय वापरता येईल
  कोणत्याही प्रकारच्या भावनिक आवाहनास बळी पडू नका

लष्करी अधिकारी किंवा जवान असल्याचे भासवून नागरिकांना ऑनलाइन वस्तू घेण्यासाठी भाग पाडत फसवणूक केली जात आहे. भारतीय लष्कराशी संबंधित कोणीही व्यक्ती अशा पद्धतीने लोकांशी संपर्क साधत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा जाहिरातींना प्रतिसाद देऊ नये.
- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा

Web Title: Online fraud in the name of the army