चिपच्या सुरक्षिततेला धक्का

चिपच्या सुरक्षिततेला धक्का

पुणे - चिप असलेले डेबिट, क्रेडिट कार्ड सुरक्षित असल्याचे बॅंका सांगत असल्या तरी, अशा चिप असूनही गेल्या तीन महिन्यांत सुमारे पाचशे खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. 

नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेनुसार सर्व बॅंकांनी ग्राहकांना सुरक्षिततेची खात्री देत सुरक्षिततेची चिप असलेल्या डेबिट कार्डचे वाटप केले. विशेषतः २०१७ मध्ये चेन्नईतील सिटी युनियन आणि त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ल्यानंतर या घटनेचे गांभीर्य ओळखून बॅंकांनी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत चिप बसविलेले डेबिट कार्ड ग्राहकांना दिले. यामुळे फसवणुकीचे प्रकार थांबतील, अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली आहे. 

कार्ड क्‍लोनिंगमुळे फसवणूक
एक-दीड वर्षात चतुःश्रृंगी, बाणेर, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, वानवडी, वाघोली, कोंढवा या भागामध्ये एटीएम केंद्रांमध्ये जाऊन पैसे काढणाऱ्या नागरिकांच्या खात्यातील रक्कम अचानक अनोळखी व्यक्तींनी काढून घेण्याचा प्रकार घडले होते. काही महिन्यांपूर्वी बाणेर, औंध परिसरामध्ये सुकामेवा विकण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून स्वाईप मशीनद्वारे पैसे स्वीकारले होते. त्यानंतर एक-दोन दिवसांत त्या व्यक्तींच्याही खात्यातील पैसे काढण्यात आले होते. विशेषतः एटीएममध्ये स्किमर, कॅमेऱ्याद्वारे कार्डवरील गोपनीय माहिती मिळवून बनावट कार्ड (कार्ड क्‍लोनिंग) तयार करून पैसे काढून घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 

कार्डवरील स्ट्रीप किती सुरक्षित?
क्रेडिट/डेबिट कार्डवर चिप बसवून गोपनीय माहितीसाठा सुरक्षित करण्यात आला; परंतु कार्डच्या पाठीमागील बाजूस असणारी काळी स्ट्रीप मात्र अजूनही तशीच आहे. त्यामुळे पेट्रोल, शॉपिंग, हॉटेलिंग करताना स्वाईप मशीनवर कार्ड वापरताना स्ट्रीपचा फायदा होतो, मात्र याच स्ट्रीपमुळे कार्ड क्‍लोनिंग करणे शक्‍य होऊ शकते. त्याद्वारे सायबर गुन्हेगार नागरिकांच्या खात्यातील पैसे काढून घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चिपचा समावेश असलेले डेबिट कार्ड असतानाही बॅंक खात्यातील रक्कम लंपास होऊ शकते. मात्र अशा घटना घडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण बॅंका त्यादृष्टीने पुरेशी काळजी घेतात; परंतु चिपवरील माहिती चोरू शकणारे चिनी मशीन येण्याची चिन्हे आहेत. 
- ॲड. जयश्री नांगरे, सायबर कायदा तज्ज्ञ

डेबिट कार्डला चिप असूनही खात्यातील पैसे चोरीला जाण्याचे तीन महिन्यांत ५०० प्रकार घडले आहेत. एटीएममध्ये किंवा खरेदीच्या वेळी कार्ड स्वाईप केल्यानंतर काही दिवसांनी खात्यांमधील पैसे जातात. कार्ड क्‍लोनिंगद्वारे होणारी फसवणूक मोठ्या प्रमाणात होते.
- जयराम पायगुडे,  पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा

एटीएमवर घ्या काळजी 
  एटीएम मशिनवर स्कीमर नसल्याची खात्री करा. 
  कीपॅडवर पिन क्रमांक टाकण्यापूर्वी तेथे कॅमेरा, रेकार्डर नसल्याची खात्री करा
  बॅंकेकडून येणारे मेसेज, ओटीपी इतरांना सांगू नका
  ई-मेल, नेटबॅंकिंग, ऑनलाइन व्यवहारांसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा
  बॅंकेविषयीची माहिती मोबाईलमध्ये ठेवू नका
  कार्डचा पिन क्रमांक सतत बदला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com