डॉ. केळकर म्हणताहेत, लॉकडाउनचा मार्ग देशासाठी ठरला चपखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांनी आयोजित केलेल्या ‘विनिंग स्ट्रॅटेजिज इन कोविड वॉर’ या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानात डॉ. केळकर बोलत होते.

पुणे : "प्रत्येक देशात कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली स्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे आपल्या क्षमतांप्रमाणे प्रत्येक देशाने आपली रणनिती आखली. आपल्या देशातील नागरिकांमध्ये शिक्षण आणि शिस्तीचा अभाव लक्षात घेता आपण स्वीकारलेला लॉकडाऊनचा मार्ग अतिशय चपखल ठरला. या काळात आपण देशातील आरोग्य यंत्रणेत मोठी सुधारणा करु शकलो," असे मत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी व्यक्त केले.

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांनी आयोजित केलेल्या ‘विनिंग स्ट्रॅटेजिज इन कोविड वॉर’ या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानात डॉ. केळकर बोलत होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट हे सहभागी झाले होते. 

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

डॉ. केळकर म्हणाले, "सूर्यप्रकाशात कोरोनाचा विषाणू थोडा क्षीण होतो. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे सकाळी फिरायला जाणे शक्य नाही. त्यामुळे ‘डी’ जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्याची गरज आहे. कोरोना बंदिस्त वातावरणात सहजपणे पसरतो, पण जिथे खेळती हवा आहे अशा ठिकाणी त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत नाही. चंडीगडसारख्या शहरांमध्ये हे दिसून आले आहे. प्राणायामाबरोबरच विशिष्ट पद्धतीने केलेली जलनेती असे उपाय आपण सहजपणे करु शकतो." डॉ. केळकर यांनी यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. डॉ. माधव भट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

डॉ. धनंजय केळकर यांच्या व्याख्यानातील महत्त्वाचे मुद्दे :

  • कोरोना हा अतिशय सूक्ष्म विषाणू असल्याने तो दिसत नाही. त्याच्या प्रसारचा अंदाज बांधता येत नसल्याने तो रोखता येत नाही. 
  •  विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तोंडावर मास्क लावणे अनिवार्य आहे. सुती कापडाचा मास्क वापरणे सर्वात सोपा मार्ग.
  •  सर्जिकल मास्क किंवा एन ९५ मास्क वापरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत काटेकोरपणे पाळण्याची गरज.
  • कोरोनाच्या प्रसाराचा केंद्रबिंदू सातत्याने बदलत आहे. 

 

 

"कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधानता आणि प्रतिबंधात्मक योजना हेच दोन उपाय महत्त्वाचे राहणार आहेत. प्रत्येकाने हलकासा किंवा झेपेल इतका व्यायाम केला पाहिजे कारण त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि त्याचा फायदा होत असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोनाच्या विषाणूबाबत अद्याप जगाला संपूर्ण आणि नेमके ज्ञान मिळालेले नाही. त्यामुळे त्यावरचा नेमका उपायदेखील अद्याप मिळू शकलेला नाही."
- डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online lecture on ‘Winning Strategies in Covid War’