‘ऑनलाइन मार्केटिंग’साठी प्रयत्नशील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

शिरूर - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. भविष्यात महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘ॲमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’च्या धर्तीवर ‘ऑनलाइन मार्केटिंग’साठीही संचालक मंडळामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले यांनी ही माहिती दिली. 

ग्रामीण भागात महिला बचत गटांमार्फत उत्पादित झालेल्या वस्तू व मालाची नेमकी गरज कुठे आहे, याबाबतची माहिती नसल्याने बचत गटांमार्फत तयार झालेल्या मालाला उठाव मिळत नाही. त्यामुळे हा माल कुठे व कसा विकायचा, याची विवंचना अनेक महिला बचत गटांना पडली आहे. महिला बचत गटांची ही गरज ओळखून लवकरच जिल्हा बॅंकेमार्फत बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रगत युगाची गरज ओळखून बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी ‘ऑनलाइन मार्केटिंग’साठी प्रयत्न केले जात आहेत. संचालक मंडळाची याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे डॉ. शिवले यांनी सांगितले.  मेळाव्यात तालुक्‍याच्या विविध भागांतील १५ बचत गटांतील तीनशे महिलांना कागदी व कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण जिल्हा बॅंकेतर्फे देण्यात आले. बचत गटांच्या क्षेत्रीय समन्वयक ललिता पोळ, प्रशिक्षक अरुणा जाधव, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे; बॅंकेचे विभागीय अधिकारी रंगनाथ टेमगिरे, संसाधन अधिकारी  रमेश बांडे, श्रीमती तेजश्री देशमुख, शाखा व्यवस्थापक म्हस्के, मीना कोरेकर, वैशाली चव्हाण, सौ. वीरशैव, परवीन शेख, जनाबाई मल्लाव आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील महिला बचत गटांत कार्यरत महिलांना विविध व्यवसायांचे, उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे. ऑनलाइन बॅंकिंग, ऑनलाइन मार्केटिंगबाबतही प्रशिक्षणही सुरू केले आहे.
- डॉ. वर्षा शिवले, संचालक, पुणे जिल्हा बॅंक  

Web Title: Online Marketing Varsha Shivale