#OnlineMedicine औषध खरेदी काउंटरवरच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पुणे - शहरातील १०० पैकी २७ जण औषधांची ‘ऑनलाइन’ खरेदी करतात. मात्र ‘ऑनलाइन’पेक्षा ओळखीच्या फार्मासिस्टकडून औषध खरेदी करण्यास ७३ जणांनी प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे. चेन्नई आणि त्यापाठोपाठ आता दिल्ली उच्च न्यायालयानेही ‘ऑनलाइन’ औषधविक्रीवर बंदी घातली आहे.

पुणे - शहरातील १०० पैकी २७ जण औषधांची ‘ऑनलाइन’ खरेदी करतात. मात्र ‘ऑनलाइन’पेक्षा ओळखीच्या फार्मासिस्टकडून औषध खरेदी करण्यास ७३ जणांनी प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे. चेन्नई आणि त्यापाठोपाठ आता दिल्ली उच्च न्यायालयानेही ‘ऑनलाइन’ औषधविक्रीवर बंदी घातली आहे.

देशात औषधांच्या ‘ऑनलाइन’ विक्रीबाबत एकाबाजूला न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्याच वेळी दुसरीकडे औषध दुकानदारांनी रस्त्यावर या विरोधात निदर्शने केली आहेत. औषध दुकानदारांच्या संघटनेने बेमुदत बंदचे हत्यारही उपसले होते. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात सध्या ‘ऑनलाइन’ औषधविक्री होते का, याची चाचपणी करण्यासाठी ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीतून ही माहिती पुढे आली आहे.

का करतात ‘ऑनलाइन’ खरेदी?
 सुविधा उपलब्ध असल्याने
 औषध दुकानात जाण्याचा वेळ वाचतो
 घरपोच औषधे मिळतात
 औषध खरेदीवर सवलत मिळते

का करतात दुकानातून खरेदी?
 वर्षानुवर्षे त्या दुकानातून औषध खरेदी केल्याने 
 फार्मासिस्ट ओळखीचा असतो
 औषधे कशी घ्यायची, याची माहिती मिळते
 नवीन औषधांची माहिती होते

...अशी केली पाहणी
शहराच्या वेगवेगळ्या भागांतील आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या २५ ते ४० वयोगटातील १०० व्यक्तींशी ‘ऑनलाइन’ औषध विक्रीबाबत संपर्क साधला. शहरातील औषध विक्रीचे सर्वसाधारण प्रमाण किती आहे, औषधांची ‘ऑनलाइन’ खरेदी नेमक्‍या कोणत्या घटकाकडून होते, या पद्धतीने खरेदी केलेली औषधे कोण घेतं याची सर्वसाधारण माहिती यातून घेण्यात आली. त्याच्या विश्‍लेषणातून हे स्पष्ट झाले आहे. 

निष्कर्ष
 २७ पैकी १५ जण हे रुग्ण असून ते स्वतःच ही औषधे घेतात
 १२ जण आपल्या घरातील व्यक्तींसाठी औषध खरेदी करतात
 त्यात मधुमेह, रक्त पातळ होण्याच्या गोळ्या, रक्तदाब अशी नियमित लागणारी औषधे आहेत.

‘ऑनलाइन’ औषध विक्रीवर केलेली कारवाई
अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाने शहरात २०१५ पासून औषधाच्या ‘ऑनलाइन’ विक्रीविरोधात कारवाया सुरू केल्या आहेत. आतापर्यंत ३६ कंपन्यांना नोटीस बजावल्या आहेत. त्यातील बहुतांश कंपन्या या परराज्यांतील आहेत. त्यामुळे या कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत त्या त्या राज्यातील ‘एफडीए’ला कळविले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये ‘ऑनलाइन’ औषधविक्री करणाऱ्या चार कंपन्यांचे परवाने रद्द केले असून, तीन परवाने निलंबित केले आहेत. 

‘ऑनलाइन’ विक्रीसाठी स्थानिक दुकानदारांची मदत
पूर्वी परराज्यांतील औषधे ग्राहकांना कुरिअरने घरपोच केली जात होती. पण आता ‘ऑनलाइन’ औषधांच्या विक्रीसाठी स्थानिक दुकानदारांशी या कंपन्या करार करत असल्याची माहिती पुढे आली आहे. अशा एका दुकानदारावरही ‘एफडीए’ने कारवाई केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

औषधांच्या ‘ऑनलाइन’ विक्रीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मुख्यालयातून आलेल्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल; पण याबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना औषध निरीक्षकांना दिल्या आहेत.
- एस. बी. पाटील, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

‘ऑनलाइन’माध्यमातून नशा येणारी औषधे सहजतेने मिळत होती. त्यामुळे औषधाच्या ‘ऑनलाइन’ विक्रीवर घातलेली बंदी समाजाच्या हिताची आहे. चेन्नई आणि दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आता ‘एफडीए’ने केली पाहिजे. त्यासाठी औषध विक्रेत्यांची संघटना त्यांना सर्वतोपरी सहकार्यासाठी करेल.
- सुशील शाह, अध्यक्ष, पुणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

Web Title: Online Medicine Purchasing on Counter