गॅस सिलिंडरचे ऑनलाइन पेमेंट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

पुणे - हजार-पाचशेच्या नोटा जमा केल्यानंतर सुटे पैसे काढण्यासाठी बॅंकांमधून किंवा त्यांच्या एटीएममधूनही भल्या मोठ्या रांगाच्या रांगा लागल्याने गॅससारख्या जीवनावश्‍यक वस्तूंसाठी "ऑनलाइन' हा सक्षम पर्याय ठरल्याचे दिसून येत आहे. शहरातील बहुसंख्य ग्राहकांनी गॅसचे पैसे ऑनलाइन जमा केल्याचे दिसत आहे. 

पुणे - हजार-पाचशेच्या नोटा जमा केल्यानंतर सुटे पैसे काढण्यासाठी बॅंकांमधून किंवा त्यांच्या एटीएममधूनही भल्या मोठ्या रांगाच्या रांगा लागल्याने गॅससारख्या जीवनावश्‍यक वस्तूंसाठी "ऑनलाइन' हा सक्षम पर्याय ठरल्याचे दिसून येत आहे. शहरातील बहुसंख्य ग्राहकांनी गॅसचे पैसे ऑनलाइन जमा केल्याचे दिसत आहे. 

मोबाईलवरून गॅसचा क्रमांक लावून गॅस घरी आल्यानंतर पैसे देण्याची व्यवस्था आता शहरात वेगाने बदलली जात आहे. 8 नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून घरी आलेल्या गॅसला पैसे कसे द्यायचे, असा प्रश्‍न बहुसंख्य ग्राहकांपुढे होता. याला पेट्रोलियम कंपन्यांनी सहकार्य केले. पण, या प्रश्‍नातून कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी गॅस कंपन्यांनी ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन देण्याचा निर्धार केला आहे. 

भारत गॅस कंपनीने आपल्या ग्राहकांच्या मोबाईलवर "एसएमएस' करून ऑनलाइन पेमेंटची सुविधा कार्यान्वित केल्याची माहिती दिली. तसेच, संकेतस्थळावरून गॅस नोंदवितानाही या सुविधेची माहिती ठळकपणे देण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून संकेतस्थळावरून गॅस नोंदणी वाढली असल्याचे निरीक्षण गॅस वितरकांनी नोंदविले आहे. 
या बाबत बोलताना श्रीराम गॅस एजन्सीचे मयूरेश जोशी म्हणाले, ""ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंटला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. सुट्या पैशांच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी ग्राहक ऑनलाइनकडे वळले आहेत.'' 

एटीएमपुढे रांगा आणि बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी अशा स्थितीत घरातील गॅस संपला. घरात गॅस मिळेल इतकी रोख रक्कमही नव्हती. अशा वेळी मोबाईलवर भारत गॅसचा "ऑनलाइन पेमेंट'चा "एसएमएस' आला. तातडीने संकेतस्थळावर "लॉगइन' करून पैसे भरले आणि काही तासांमध्ये सिलिंडर घरी आला. त्यामुळे भविष्यात सिलिंडर घरी आल्यानंतर पैसे देण्यापेक्षा याच पद्धतीने बुकिंग आणि पैसे भरण्यास प्राधान्य देणार आहे. 
- सुशांत पाटील, ग्राहक 

Web Title: Online payment cylinders