दस्त हाताळणी शुल्क आता "ऑनलाइन' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

दस्त रजिस्टर करताना किती पाने आहेत, त्यांचा हिशेब करून रोख पैसे द्यावे लागतात. अनेकदा सुट्टे पैसे नसल्यामुळे हेलपाटे मारण्याची वेळ खरेदीदारावर येते. हाताळणी शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहर व जिल्ह्यात शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. 

पुणे : दस्त रजिस्टर करताना किती पाने आहेत, त्यांचा हिशेब करून रोख पैसे द्यावे लागतात. अनेकदा सुट्टे पैसे नसल्यामुळे हेलपाटे मारण्याची वेळ खरेदीदारावर येते. हाताळणी शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहर व जिल्ह्यात शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. 

दस्त नोंदणी करताना दुय्यम निबंधक कार्यालयात आकारण्यात येणारे हाताळणी शुल्क ऑनलाइन पद्धतीने (कार्ड पेमेंट) स्वीकारण्यास नुकतीच शासनाने मान्यता दिली आहे. याची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहर व ग्रामीण भागातील काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये आजपासून (ता. 7) सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालये आता खऱ्या अर्थाने कॅशलेस होणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव नोंदणी विभागाने राज्य शासनाला पाठविला होता. 

नोंदणी विभागातील अधिकारी म्हणाले, ""शहर आणि ग्रामीण भागातील काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त हाताळणी शुल्क कार्डद्वारे घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आजपासून ही सुविधा कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करून टप्प्याटप्प्याने ती सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये सुरू केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना या कार्यालयात रोख रक्कम द्यावी लागणार नाही.'' 

नागरिकांची लुबाडणूक थांबण्यास मदत 

दस्त हाताळणी शुल्क निश्‍चित असताना त्यातून गैरप्रकार घडतात. प्रत्येक पानासाठीचा दर निश्‍चित असतानाही एजंट अथवा कर्मचाऱ्यांकडून जादा पैसे आकारले जातात, अशा तक्रारी नोंदणी विभागाकडे येतात. दस्तनोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात प्रतिपान 20 रुपये शुल्क आकारले जाते.

त्यामुळे दस्तांची पाने जितकी जास्त तितके शुल्क नागरिकांना भरावे लागते; परंतु अनेक कार्यालयात प्रतिपान शंभर रुपये शुल्क आकारून नागरिकांची लुबाडणूक होते. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने ही रक्कम ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये होणारी नागरिकांची लुबाडणूक थांबण्यास मदत होणार आहे. 
 

 

Web Title: Online System for Registration Pune