
पुणे - ‘ऑनलाइन टास्क’मध्ये गुगलवर रिव्ह्यू केल्यास जादा कमिशनचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून गुरुवारी अटक केली.
तुषार प्रकाश अजवानी (वय ३७, रा. वॉटरफोर्ड जुहू लेन, अंधेरी पश्चिम, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी तुषारने फिर्यादीला ‘पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून व्हॉटस॒ॲपवर मेसेज पाठवला. त्यानंतर गुगलवर एका कंपनीला रिव्ह्यू दिल्यास बॅंक खात्यात पैसे जमा होतील, असे सांगितले.
त्यानुसार तुषार आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या खात्यात किरकोळ रक्कम जमा करुन विश्वास संपादन केला. त्यानंतर जादा फायद्यासाठी टेलिग्रामवर लिंक पाठवून बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. फिर्यादीने वेळोवेळी ३४ लाख ९७ हजार रुपये जमा केले. परंतु कोणताही परतावा न मिळाला नाही. ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सायबर पोलिसांनी बॅंक खात्यांचा तांत्रिक तपास केला. त्यात आरोपी मुंबईतील जुहू येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलिस कर्मचारी अमर बनसोडे, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, आणि सुनील सोनुने यांचे पथक मुंबईला रवाना झाले.
या पथकाने आरोपी तुषारला गुरुवारी अटक केली. न्यायालयाने आरोपीला १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त आर.एन. राजे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, नागरिकांनी टास्क फ्रॉड, पार्ट टाइम जॉब, जादा परतावा आणि जादा कमिशनचे आमिष दाखविणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.