ऑनलाइन व्यवहार करताय, काळजी घ्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

पुणे : मागील वर्षीप्रमाणेच यंदाही ऐन दिवाळीच्या दिवसात एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्या नागरिकांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यामध्ये दाखल फिर्यादीनुसार पावणे पाच लाख रुपयांची आत्तापर्यंत फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी एटीएम केंद्रांमध्ये पैसे काढताना किंवा भरताना काळजी घेण्याचे आवाहन सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले आहे. 

सुभाष मार्कंडेय (वय 44, रा. बालेवाडी) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 25 ऑक्‍टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत फिर्यादी यांच्यासह काही नागरिकांनी चाकणकर मळा परिसरातील ऍक्‍सिस बॅंकेच्या एटीएम केंद्राबरोबरच अन्य बॅंकांच्या एटीएम केंद्रामध्ये व्यवहार केला. त्या वेळी त्यांच्या कार्डची गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींनी स्कीमरच्या साह्याने चोरून बनावट एटीएम कार्ड बनवून या बॅंकेसह अन्य बॅंकांच्या खातेदारांची तब्बल 4 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या स्वरूपाच्या चार ते पाच तक्रारी सायबर गुन्हे शाखेला प्राप्त झाल्या आहेत. 

दिवाळीचा मुहूर्त 
मागील वर्षी याच पद्धतीने ऐन दिवाळीमध्ये पाषाण, बाणेर, औंध, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रेंजहिल्स यासारख्या भागातील एटीएम केंद्रांवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या शंभरहून अधिक नागरिकांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपये अनोळखी व्यक्तींनी काढून घेतल्याचा प्रकार घडला होता. यासंबंधी तक्रारी आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेने काही जणांना अटक केली होती. दरम्यान या दिवाळीतही हाच प्रकार पुन्हा घडत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

"दिवाळीच्यावेळी एटीएम सेंटरमध्ये गेलेल्या नागरिकांच्या खात्यातील पैसे चोरीस जाण्याचा प्रकार घडला होता. त्यानुसार पुन्हा अशा घटना घडू नयेत, यादृष्टीने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, यासाठी आम्ही जागृती करत आहोत.'' 
- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा. 

एटीएम/मोबाईल/ऑनलाइन व्यवहार करताना ही काळजी घ्या. 
* एटीएम केंद्राचे व्यवस्थित निरीक्षण करा. 
* एटीएममध्ये संशयास्पद आढळल्यास व्यवहार टाळा. 
* स्कीमरद्वारे कार्डची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. 
* की-पॅडवर पीन क्रमांक टाकण्यापूर्वी कॅमेरा, रेकॉर्डर नसल्याची खात्री करणे. 
* संशयास्पद व्यक्तीविषयी सुरक्षारक्षकास माहिती देणे. 
* सुरक्षित (एचटीटीपीएस) वेबसाइटसचाच वापर करा. 
* खरेदीपूर्वी त्या वेबसाइटची सत्यता पडताळून व बारकाईने पहा. 

Web Title: Online transactions be careful