दीडशे सिग्नलच्या देखभालीसाठी फक्त आठ जण

ब्रिजमोहन पाटील
शनिवार, 20 जुलै 2019

सिग्नल बंद पडल्यानंतर दुरुस्तीसाठी किमान अर्ध्या तासात तेथे पथक जाणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडीने नागरिकांचे मोठे नुकसान होते; परंतु याचे गांभीर्य प्रशासनाला नाही. पुण्यात किमान १० ते१२ पथके असतील तर वाहतूक सुरळीत होऊ शकते. 
- प्रशांत इनामदार, संस्थापक, ‘पादचारी प्रथम’

पुणे - स्मार्ट सिटी अशी पुण्याची ओळख असली तरी, सिग्नल व्यवस्था मागास आहे. शहरात असलेल्या २४२ सिग्नलच्या देखभालीसाठी फक्त दोन इंजिनिअर, चार कामगार आणि त्यांच्या मदतीला दोन वाहतूक पोलिस (चार्ली) आहेत. सिग्नल दुरुस्त करताना या पथकाच्या नाकीनऊ येत असून, त्यामुळे सर्वच भागातील वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पालिकेडून पायाभूत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न असला तरी, वाहनांची आणि सिग्नलची संख्या याकडे पालिकेचे लक्ष नाही. शहरात एकूण २४२ सिग्नल आहेत. पावसाळ्यात दररोज २० ते २५ सिग्नल खराब होतात. इतर वेळी १० ते १२ सिग्नल बंद पडतात. सिग्नल बंद पडला की त्याची माहिती वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला दिली जाते. तेथून वाहतूक पोलिसाला म्हणजेच ‘चार्ली’ला वायरलेसवर निरोप दिला जातो. पोलिस आणि ठेकेदारांचे इंजिनिअर, त्यांच्यासोबतचे दोन मजूर सिग्नलच्या ठिकाणी जाऊन सिग्नल दुरुस्ती करतात. सध्या अशी दोन पथके देखभाल दुरुस्ती करत असून, प्रत्येक पथकात चार जण आहेत. 

सिग्नल देखभाल करण्यासाठी महापालिकेने वर्षभरासाठी एक कोटीची निविदा काढली आहे. त्यानुसार ठेकेदाराने दोन पथके तयार केली आहेत. एका पथकात इंजिनिअर, दोन कामगार आणि एक पोलिस असतो. सिग्नल देखभाल करण्यासाठी हे पथक पुरेसे आहे, असा दावा महापालिकेचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी केला.

एका सिग्नलसाठी जातो अर्धा दिवस 
एकाच वेळी दोन किंवा तीन सिग्नल बंद पडले की नेमका कोणता सिग्नल दुरुस्त करावा, याचा गोंधळ होतो. दोन वेगवेगळ्या भागातील सिग्नल बिघडल्यास तेथे जाण्यासाठी बराच वेळ लागतो. सिग्नल दुरुस्त करताना वीज, बल्ब जाणे, दिवा फुटणे असे काम असेल तर ते लगेच दुरुस्त होतात; पण एखादा पार्ट उपलब्ध नसला किंवा सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यास एकच सिग्नल दुरुस्तीसाठी पूर्ण एक दिवस जातो. सिग्नल दुरुस्तीला उशीर झाला की त्याचा ताण वाहतुकीवर येतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 8 Person for 250 Signal repairing