#PMCIssue "सबका साथ', तरी खुरडत विकास 

#PMCIssue "सबका साथ', तरी खुरडत विकास 

पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निवडणुकांपूर्वी "सबका साथ, सबका विकास'ची गर्जना करत, नव्या योजना आखून महापालिकेचा अर्थसंकल्प "वजनदार' केला; त्यातून शहर विकासाचे नवे मॉडेलही मांडले. परंतु, अर्थसंकल्प सादर होऊन सात महिने होऊन गेले तरी केवळ 14 टक्केच कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. त्यात गल्लीबोळातील किरकोळ कामांच्या नोंदी दाखवून विकासाला "गती' देत असल्याची धूळफेक प्रशासनाने केली. दीड वर्षे सत्तेत असतानाही प्रशासनावर पकड निर्माण न केल्यानेच शहराचा खुरडत "विकास' होत आहे. प्रभागांमधील "इंटरेस्ट' योजनांवर आडून राहणारे काही नगरसेवक शहराच्या हिताकडे दुर्लक्ष करीत असल्याने मूळ योजनाच रखडल्या आहेत. दुसरीकडे आपली "कार्यक्षमता' लपविण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासन अपयशाचे खापर एकमेकांवर फोडत आहेत. 

वरिष्ठ अधिकारी वैयक्तिक कामे अडवत असल्याची तक्रार भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी पुण्यात केली. मात्र, पुणेकरांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता का झाली नाही?, याचे उत्तर देण्यासाठी एकही नगरसेवक त्यांच्यासमोर आला नाही. नगरसेवकांच्या कामांची पद्धत आणि प्रशासनही केवळ कागद रंगवण्यापलीकडे ठोस पावले उचलत नसल्याचेच दिसत आहे. ही कामे क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवरील आहेत. त्यामुळे शहराचा विकास अर्थसंकल्पापुरताच मर्यादित राहिला आहे. 

महापालिकेच्या उत्पन्नात घट झाल्यानंतरही भाजपने तब्बल सव्वापाच कोटींचा दुसरा अर्थसंकल्प मांडला. कल्याणकारी योजना बाजूला सारून जुने प्रकल्प पूर्ण करतानाच पुणेकरांना दर्जेदार पायाभूत सुविधा पुरविण्याला प्राधान्य देणार असल्याचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करताना चार हजार 443 कामांच्या योजना मार्गी लावल्याचे नियोजन प्रशासनाने केले. त्यामुळे संपूर्ण शहराचा कायापालट होण्याची आशा प्रशासनाच्या दाव्यावरून होती. प्रत्यक्षात मात्र, एवढ्या कामांपैकी केवळ 608 कामांच्याच निविदा काढल्या आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासन जोमाने काम करीत असल्याचे सर्वसाधारण सभेत जाहीर केले. त्यानंतर भाजपचे नगरसेवक सुशील मेंगडे यांनी मागविलेल्या माहितीतून किती कामे सुरू आहेत?, याचे चित्र स्पष्ट झाले. 

काय आहेत योजना ? 
नव्या रस्त्यांची बांधणी, नवे उड्डाण पूल, रस्त्यांचे रुंदीकरण, जलवाहिन्यांचे जाळे विस्तारणे, सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन), महापालिकेची रुग्णालये आणि हॉस्पिटलमधील सेवा विस्तारणे, ई-लर्निंग, नाट्यगृहे, मोकळ्या जागांची स्वच्छता, जुन्या पुलांची डागडुजी, नव्या गावांमधील विकासकामे. 

शहरात आवश्‍यक ती कामे करण्यात येत आहेत. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून ती सुरू केली आहेत. नियोजित कामे एकाच वेळी सुरू करणे शक्‍य होत नाही. मात्र, कामांना वेग आहे. पुढील पाच महिन्यांत कामे संपविण्यात येतील. 
- राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

क्षेत्रीय कार्यालयाचे नाव मंजूर कामे सुरू कामे 
नगर रस्ता 322 25 
येरवडा-धानोरी 360 19 
ढोले-पाटील रस्ता 278 50 
औंध-बाणेर 230 40 
शिवाजीनगर -घोले रस्ता 111 25 
कोथरूड-बावधन 305 77 
धनकवडी-सहकारनगर 336 14 
सिंहगड रस्ता 387 50 
वारजे-कर्वेनगर 269 25 
हडपसर-मुंढवा 375 92 
वानवडी-रामटेकडी 263 76 
कोंढवा-येवलेवाडी 287 65 
कसबा-विश्रामबागवाडा 395 22 
भवानी पेठ 299 5 
बिबवेवाडी 226 28 


क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर कामे होण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका असते. तरीही कामे होत नसतील तर जबाबदार अधिकाऱ्यांना सूचना केल्या जातील. सर्वसाधारण सभेत खुलासा मागितला जातो. मात्र, प्रत्यक्षात कामांची पाहणी करण्यात येईल. अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीवर पूर्णपणे भर राहील.
- मुक्ता टिळक, महापौर

पुणेकरांना अत्यंत चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध होतील, अशी आशा खोटी ठरली आहे. मुळात कचऱ्याचा प्रश्‍न सोडविता आला नाही. भरमसाट योजना जाहीर करण्यापेक्षा महत्त्वाचे प्रकल्प तरी मार्गी लागायला हवेत. आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा वेळेत उभारण्याची गरज आहे.
- अनिल जाधव, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com