प्रवेश निश्‍चितीसाठी केवळ एक हजार रुपये 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे - अभियांत्रिकी प्रवेशा वेळी यापूर्वीसारखे पाच हजार रुपये प्राथमिक शुल्क भरावे लागणार नाही. आता अर्ज निश्‍चिती केंद्रावर जाऊन प्रवेश निश्‍चितीसाठी प्रक्रिया शुल्क म्हणून केवळ एक हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने भरावे लागतील. विद्यार्थ्यांना ही रक्कम परत मिळणार नाही. 

पुणे - अभियांत्रिकी प्रवेशा वेळी यापूर्वीसारखे पाच हजार रुपये प्राथमिक शुल्क भरावे लागणार नाही. आता अर्ज निश्‍चिती केंद्रावर जाऊन प्रवेश निश्‍चितीसाठी प्रक्रिया शुल्क म्हणून केवळ एक हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने भरावे लागतील. विद्यार्थ्यांना ही रक्कम परत मिळणार नाही. 

गेल्या वर्षीपर्यंत पाच हजार रुपये प्राथमिक शुल्क घेतले जात होते. त्यातील एक हजार रुपये प्रक्रिया शुल्क आणि चार हजार रुपये महाविद्यालयांचे शुल्क म्हणून घेतले जात होते. ऑनलाइन शुल्क भरताना अडचणी आल्याने डीडीद्वारे शुल्क भरण्याची मुभा देण्यात आली होती. तंत्र शिक्षण संचालनालयाकडून ही रक्कम वेळेत महाविद्यालयांना मिळाली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संस्थांमध्ये चार हजार रुपये अतिरिक्त भरावे लागले होते. 

विद्यार्थ्यांनी काढलेल्या डीडीची वैधतेची मुदत तीन महिन्यांनी संपल्याने त्याची रक्कम परत मिळण्यातही अडचणी आल्या होत्या. याची दखल घेऊन सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) यावर्षी प्रक्रिया शुल्क म्हणून विद्यार्थ्यांकडून केवळ एक हजार रुपये स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी प्रवेश निश्‍चित करतील, त्या वेळी अर्ज निश्‍चिती केंद्रावर (एआरसी) ते शुल्क भरावे लागेल, असे सूचित करण्यात आले आहे. 

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी जातवैधता आणि नॉन क्रिमिलेयर ही प्रमाणपत्रे आवश्‍यक आहेत. कागदपत्रांच्या पडताळणी वेळी ही प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांजवळ असणे आवश्‍यक आहे. ती सादर करता आली नाही, तर त्या विद्यार्थ्याला प्रवेश फेऱ्यांमध्ये सर्वसाधारण (जनरल) गटातील समजले जाईल, असे "सीईटी सेल'ने स्पष्ट केले आहे. 

Web Title: Only one thousand rupees for admission in engineering admission