बालगंधर्वच्या पुनर्विकासासाठी राष्ट्रीय पातळीवरून प्रस्ताव मागविणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

पुणे : बालगंधर्व रंग मंदिराच्या पुनर्विकासासाठी राष्ट्रीय पातळीवर जाहिरात देऊन प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातील प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणे : बालगंधर्व रंग मंदिराच्या पुनर्विकासासाठी राष्ट्रीय पातळीवर जाहिरात देऊन प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातील प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

महापौर मुक्ता टिळक यांनी ही बैठक बोलाविली होती. स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते. बालगंधर्व रंग मंदिराचा पुनर्विकास भाजपचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या प्रकल्पाविषयी भवन रचना विभागाने केलेल्या प्रस्तावाचे सादरीकरण झाले. हा प्रस्ताव साध्या स्वरूपाचा असल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ही वास्तू आंतरराष्ट्रीय दर्जाची करायची आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रात जाहिरात देऊन यासाठी प्रस्ताव मागविण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. एकूण जागा, चटई निर्देशांकाचा वापर, मेट्रो पार्किंगसाठी किती जागा दिली जाईल, याबाबतचा त्यात समावेश असला पाहिजे, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. 

प्रस्तावांना गती देण्याची सूचना 
अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, सावित्रीबाई फुले नर्सिंग महाविद्यालय, बाणेर येथील बहुउद्देशीय रुग्णालय, नदीवरील सर्व पुलांचे सुशोभीकरण, श्‍वान संगोपन केंद्र, अग्निशामक दलाचे अत्याधुनिकीकरण, ज्येष्ठ नागरिक भवन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आदींबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच याबाबतच्या प्रस्तावांना गती देण्याची सूचना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला केली. 
 
बालगंधर्व रंग मंदिराच्या पुनर्विकासासाठी सर्व घटकांकडून सूचना मागविल्या जाणार आहेत. त्याचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाईल. 
- मुरलीधर मोहोळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष. 
 

Web Title: To ooffer a proposal from the national level for redevelopment of balgandharva