शहरात ओपन बार जोमात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांचे दुर्लक्ष
पिंपरी - पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर पुन्हा ओपन बार जोमात सुरू आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस यंत्रणा व महापालिका यांच्या दुर्लक्षामुळे ते सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांचे दुर्लक्ष
पिंपरी - पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर पुन्हा ओपन बार जोमात सुरू आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस यंत्रणा व महापालिका यांच्या दुर्लक्षामुळे ते सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

पिंपरी चौक, चिंचवड स्टेशन, कुदळवाडी, काळेवाडी, भोसरी उड्डाण पुलाखाली, डांगे चौक, चिंचवडगाव आदी परिसरात वाइन शॉपच्या समोरच रस्त्यावरील हातगाड्यांवर दारुडे दारू पीत बसतात. अनेकदा भांडणे, शिवीगाळ व हाणामारी, धक्‍के मारणे, अश्‍लील हावभाव करणे, यामुळे महिलांना खाली मान घालून जावे लागते. पिंपरी चौकातील बसथांब्याच्या बाजूलाच ओपन बार असल्याने तेथे उभे राहणेही महिलांना जिकरीचे होते. सकाळपासूनच वाइन शॉपच्या समोर उभ्या राहणाऱ्या हातगाड्यांकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करतात. अनेकदा या दारुड्यांमध्ये भांडणेही होऊन कधी शिवीगाळ तर कधी हाणामारीही होते. चार महिन्यांपूर्वी पिंपरी चौक येथे दारुड्यांमध्ये भांडणे होऊन त्यातून एकावर चाकू हल्लाही झाला होता. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्‍त डॉ. बसवराज तेली यांनी ओपन बारवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलिस ठाण्यांना दिले होते.

त्यानंतर दोन-चार दिवसच पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा ओपन बार जोमात सुरू झाले.

रस्त्यावर दारू पीत बसणाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिसांची आहे. यापुढील काळात रस्त्यावर दारू पीत बसणाऱ्यावर नियमित व कडक कारवाई करणार.
- राम मांडूरके, सहायक पोलिस निरीक्षक, पिंपरी विभाग

परवाने देणे व तसेच कुठे बनावट दारू तयार होत असेल किंवा विक्री होत असेल अशा ठिकाणी कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला आहेत. मात्र रस्त्यावर दारू पीत बसणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.
- सुनील फुलपगार, उपायुक्‍त, राज्य उत्पादन शुल्क विभाग

Web Title: open bar in pimpri