पुणे : मौजे शहा येथे पक्षी निरीक्षण केंद्र सुरू करावे; ग्रामस्थांची मागणी

डॉ. संदेश शहा
Friday, 27 December 2019

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील मौजे शहा (ता. इंदापूर) येथील अंगणवाडीची भिंत दोन दिवसांपूर्वी वाळूमाफियांच्या ट्रॅक्टर वाहतुकीमुळे पडली. मात्र, अद्याप याची दखल प्रशासकीय पातळीवर घेतली गेली नाही.

इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील मौजे शहा (ता. इंदापूर) येथील अंगणवाडीची भिंत दोन दिवसांपूर्वी वाळूमाफियांच्या ट्रॅक्टर वाहतुकीमुळे पडली. मात्र, अद्याप याची दखल प्रशासकीय पातळीवर घेतली गेली नाही. या गावातील पिराणटेकडी हे शेकडो पक्षांचे गोकुळ फुलविण्याचे स्थान आहे. या टेकडीजवळ भीमा नदी पात्रालगत वाळूव्यवसाय अवैधपणे सुरू असल्याने या पक्षांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने येथील अवैध वाळूउपसा तातडीने बंद करून याठिकाणी पक्षी निरीक्षण केंद्र सुरू करावे अशी मागणी पक्षीप्रेमी ग्रामस्थांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उजनी धरण फुगवट्याजवळ मौजे शहा या गावातील पिरान टेकडी हे शेकडो पक्षांचे गोकुळ फुलविण्याचे केंद्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे संपूर्ण राज्यातून तसेच देश परदेशातील पक्षी प्रेमी पक्षी निरीक्षणासाठी येतात. मात्र येथे भिमा नदी लगत अवैध वाळू व्यवसाय चालत असल्याने हे अधिवास केंद्र धोक्यात आले आहे तर अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्त्याची वाट लागत असूनआता सार्वजनिक मालमत्तेचे देखील नुकसान होत आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीस कायमस्वरूपी चाप बसणे गरजेचे आहे.

मागील वर्षी पक्षी अभ्यासक अरविंद कुंभार यांनी या गावास भेट दिली होती. त्यावेळी देखील वाळू उपसा सुरू होता. त्यानंतर सकाळने अवैध वाळू उपसा होत असल्याची बातमी प्रसिद्ध करताच वाळू उपसा बंद झाला मात्र आता रात्री तसेच दिवसा चोरुन चोरून वाळूउपसा सुरू झाला आहे. आज वाळूवाल्यांनी अंगणवाडीची भिंत पाडली. मात्र उद्या वाळूची वाहने थेट आत घुसून मुलांना काही झाल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थ दबक्या आवाजात विचारात आहेत.

यापूर्वीचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या काळात संपूर्ण वाळूव्यवसाय बंद होता, त्यांचा प्रशासनावर वचक होता. मात्र सध्या वाळू माफियांना रान मोकळे मिळाले असून तालुक्यातून शेकडो वाहनातून वाळू व्यवसाय फोफावला आहे. यासंदर्भात तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, अंगणवाडीची भिंत पडल्याबद्दल प्रथम ग्रामपंचायतीने गुन्हा नोंदवावा, आपण त्यानंतर कारवाई करू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open Birds observation Center demanding Mauje Shah Villagers