सावधान! येथे विकला जातो मृत्यू; चिनी मांजाची खुलेआम विक्री

सावधान! येथे विकला जातो मृत्यू; चिनी मांजाची खुलेआम विक्री

पुणे - वेळ दुपारी १.१५. ठिकाण खडकीतील दुकान. मांजा मिळतो का?, ग्राहकाच्या प्रश्‍नावर दुकानदार ‘हो मिळतो असे सांगत कोणता घ्यायचाय?’  असा सवाल करतो. छकडीला लटकवलेला सुटा मांजा ग्राहकाने मागितला, त्यावर ‘हा मांजा घ्या, तुटणार नाही,’ असे विक्रेत्याने सांगितले. ‘हा चिनी मांजा आहे का,’ असा प्रश्‍न विचारताच होकारार्थी मान हलवीत विक्रेत्याने १२० रुपये घेऊन मांजारूपी ‘मृत्यू’ ग्राहकाला विकला. 

त्यानंतर औंधमधील दुकान किंवा जनवाडीतील रस्त्यावर तोच मांजारूपी ‘मृत्यू’ खुलेआम विकत मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘सकाळ’च्या पाहणीत आढळून आले. कुठे दोरीला लटकविलेला, तर कुठे काठीला गुंडाळलेला मांजा पक्ष्यांपासून माणसाच्या जीवावर उठलेला असूनही निगरगट्ट विक्रेत्यांकडून मांजाची सर्रास विक्री केली जात आहे. 

मकरसंक्रांतीचे औचित्य साधून जानेवारी ते एप्रिल या कालावधीत पुण्या-मुंबईसह ग्रामीण भागात पतंग उडविला जातो. मात्र, यासाठी बंदी असलेल्या चिनी मांजासह अन्य घातक मांजाचा वापर केला जातो. या मांजामुळे पक्षी, प्राणी व माणसाचे जीव जाऊ लागले. यामुळे ‘पेटा’ या संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे मांजावर बंदी आणण्याची याचिका दाखल केली होती. त्याची गांभीर्याने दखल लवादाने मांजा विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली. मात्र, महापालिका व पोलिस प्रशासनाने त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मागील वर्षी दोन तरुणींना आपला जीव गमवावा लागला. तर, एक वकील गंभीर जखमी झाले. मांजामुळे दर वर्षी हजारो पक्षी जखमी होतात. त्यापैकी दोनशे पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी शहराच्या वेगवेगळ्या भागांतील दुकानांमध्ये बनावट ग्राहक बनून पाहणी केली. त्यामध्ये औंध, खडकी, जनवाडी, हडपसर, धनकवडी, वारजे, खडकवासला यांसह शहराच्या वेगवेगळ्या भागांतील उपनगरांमध्येही ग्राहकांनी मांजा खरेदी केला. ग्राहकांनी दुकानदारांशी संवाद साधल्यानंतर दुकानात व बाहेरच्या भागात ठेवलेल्या मांजांच्या छकडी दाखवीत विक्रेत्यांनी त्यांच्या किमतीही सांगितल्या. त्याचबरोबर चायनीज, सिंथेटिक व नायलॉन यापैकी कोणता मांजा घ्यायचा आहे, अशी विचारणाही केली. त्यानंतर ग्राहकांनी त्यापैकी वेगवेगळ्या प्रकारांमधील मांजा विकत घेतला. याच पद्धतीने शहराच्या वेगवेगळ्या भागांतील छोट्या-छोट्या दुकानांमध्ये मांजा विक्री होत असल्याचे आढळून आले.

चोरून नायलॉन मांजा विक्री 
गोखलेनगर भागातील पतंग उडवणाऱ्या मुलांकडे मांजा कुठे मिळेल, अशी विचारणा केली, त्या वेळी एका मुलाने ‘सकाळ’च्या प्रतिनिधीस जनवाडीतील धर्मानगर गल्लीत नेले. तेथे एका व्यक्तीकडून २० रुपयांत नायलॉन मांजा दिला जात होता. मोठ्या संख्येने आलेली लहान मुले याच व्यक्तीकडून हा मांजा घेत होती. ‘तुम्हाला हवा तेवढा मांजा देऊ,’ असे सांगत मांजा विक्री करणारी व्यक्ती खबरदारी घेत मांजा विकत होती. वडारवाडी, जनवाडी, परिसरातील रस्त्यावर असा सर्रास मांजा विकला जात असल्याचे भयावह वास्तव आहे.

 महापालिका हद्दीतील कोणत्या व्यावसायिकांकडे मांजा उपलब्ध आहे का, त्याची विक्री केली जाते ? याच्या पाहणीसाठी नव्याने काही पथके नेमली आहेत. ज्या दुकानदारांकडे मांजा आढळत आहे तो जप्त करण्यात येत आहे. त्यानंतरही मांजा दिसून आल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. ही कारवाई क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवरही करण्यात येत आहे.
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका


मांजामुळे घडलेल्या दुर्घटना
दिनांक ७ फेब्रुवारी २०१८ -  ‘सकाळ’च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार शिवाजी पुलावरून दुचाकीवरून जात असताना चिनी मांजाने त्यांचा गळा कापला गेला. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

दिनांक ७ ऑक्‍टोबर २०१८ - नाशिक फाटा येथील जेआरडी उड्डाण पुलावरून डॉ. कृपाली निकम जात होत्या. मांजा गळ्याभोवती गुंडाळल्याने निकम रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्या. त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. 

दिनांक १ डिसेंबर २०१८ - ॲड. महेश गोगावले व त्यांचा आठ वर्षांचा मुलगा ऋग्वेद याच्यासमवेत दुचाकीवरून वडगाव शेरी परिसरात जात होते. त्या वेळी गोगावले यांच्या गळ्याभोवती मांजा अडकल्याने त्यांच्या गळ्याला खोलवर जखम झाली. तर, गाडी खाली पडल्याने ऋग्वेदही जखमी झाला.  त्यानंतर ग्राहकांनी त्यापैकी वेगवेगळ्या प्रकारांमधील मांजा विकत घेतला. याच पद्धतीने शहराच्या वेगवेगळ्या भागांतील छोट्या-छोट्या दुकानांमध्ये मांजा विक्री होत असल्याचे आढळून आले.

‘सकाळ’च्या पाहणीतील निष्कर्ष
छोट्या दुकानांमधून मांजाची सर्रास विक्री सुरू
विक्रेत्यांना पोलिस कारवाईचे भयच नाही 
लहान मुलांसह पालकही घेतायेत मांजा 
मोठ्या दुकानदारांकडून मांजा विक्रीकडे पाठ
ठराविक पुरवठादार करतायेत छोट्या दुकानदारांना मांजा पुरवठा   
पतंग उडविण्याची ठिकाणे ः नदीकाठचा परिसर, मैदाने, टेकड्या, इमारतीची गच्ची

पतंग उडविण्यासाठी चिनी व नायलॉन मांजा वापरला जाणे हे वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्‍याचे आहे. चिनी व नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मांजाचा वापर  अथवा विक्री करणारे आढळल्यास पोलिसांच्या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर माहिती द्यावी.
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

चिनी मांजा
मांजाची किंमत  - २० ते १५० रुपये
मांजाचे प्रकार - चिनी, सिंथेटिक, नायलॉन


मांजासंबंधी तक्रारी करण्यासाठी पोलिसांचे व्हॉट्‌सॲप क्रमांक 
८४११८००१०० / ८९७५९५३१००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com