विरोधकांनी भ्रष्टाचार सिद्ध करावा

विरोधकांनी भ्रष्टाचार सिद्ध करावा

पिंपरी - ‘‘विठ्ठल मूर्ती खरेदी, शवदाहिनी खरेदी अशा विविध प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रथम विरोधकांनी सिद्ध करावे. उगीचच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करू नयेत. भाजपकडे सध्या कोणताही कृतिकार्यक्रम, अजेंडा नाही. त्यामुळे असे आरोप केले जात आहेत. प्रभाग रचना निश्‍चित करताना राजकीय हेतू ठेवून डावपेच आखले गेले आहेत,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेला माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे, स्थायी समिती सभापती डब्बू आसवानी आदी उपस्थित होते.

‘‘राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचाराला कधीही पाठीशी घातलेले नाही. विरोधकांनी केलेले भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. साप-साप म्हणून भुई थोपटायचे काम सध्या सुरू आहे,’’ असे पानसरे, वाघेरे, बहल यांनी सांगितले.

वाघेरे म्हणाले, ‘‘स्थानिक आमदार, खासदार हे निष्क्रिय आहेत. शहरासाठी ते आवश्‍यक निधी आणू शकलेले नाहीत.’’ 

पानसरे म्हणाले, ‘‘येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दोन्ही विषय बारगळले आहेत. हे दोन्ही प्रस्ताव मार्गी लागले असते, तर पिंपरी-चिंचवडबरोबरच पुणे जिल्ह्यालाही त्याचा फायदा झाला असता.’’

बहल म्हणाले, ‘‘भाजपकडे कृतिकार्यक्रम, अजेंडा नाही. त्यामुळे त्यांच्याकडून महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे बिनबुडाचे आरोप होत आहेत. प्रभाग रचनेमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा हस्तक्षेप झाला आहे. निवडणूक आयोगाला आम्ही त्याबाबत पत्रदेखील दिले आहे. मागासवर्गीयांचा निधी पूर्ण खर्च व्हायला हवा, अशी भूमिका एकीकडे नगरसेविका सीमा सावळे घेतात, तर दुसरीकडे त्याच न्यायालयात जाऊन झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रकल्पांना स्थगिती आदेश आणतात, हे पटत नाही.’’

भाजपचे अमोल थोरात यांचा नामोल्लेख करून कदम म्हणाल्या, ‘‘साई उद्यानाच्या विषयात आकसापोटी इमारती पाडण्याची भूमिका घेतली जात आहे. आयुक्तांच्या बदलीची मागणी केली जात आहे. प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे पाळलेली नाहीत.’’

महेश लांडगे ‘राष्ट्रवादी’चेच
‘‘आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक पदाचा अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे ते अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत,’’ असे माजी महापौर आझम पानसरे यांनी स्पष्ट केले. ‘‘लांडगे याबाबत त्यांचा वैयक्तिक खुलासा देतील,’’ असे सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com