ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाहण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

विज्ञान भारतीतर्फे ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन 

पुणे - राज्य सरकार, विज्ञान भारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात ११ ते १४  मे या कालावधीमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत.

विज्ञान भारतीतर्फे ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन 

पुणे - राज्य सरकार, विज्ञान भारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात ११ ते १४  मे या कालावधीमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत.

‘एक्‍स्पो’चे उद्‌घाटन ११ मे रोजी सकाळी अकरा वाजता होईल. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय (डीएसटी), जैवतंत्रज्ञान मंत्रालय (डीबीटी), केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) यांच्यासह देशभरात विविध विज्ञान क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्था या ‘एक्‍स्पो’मधून आपले संशोधन नागरिकांसमोर मांडणार आहेत. याशिवाय पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांतून पाहण्याची संधीही या वेळी मिळणार आहे.

संमेलनाचे उद्‌घाटन १२ मे रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे या वेळी उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एम. एम. शर्मा, प्रा. एम. एस. वलियथन, प्रा. एस. रंगनाथन, प्रा. के. सी. मल्होत्रा आणि डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्यासह अनेक शास्त्रज्ञ संमेलनात मार्गदर्शन करतील, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक मुकुंद देशपांडे यांनी दिली.

‘पारंपरिक आणि आधुनिक विज्ञानाचा संगम : विकासाची नवी एकात्मिक दृष्टी’ हे यंदाच्या संमेलनाचे सूत्र असून जैवविज्ञान, पृथ्वी विज्ञान, खगोलशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, तंत्रज्ञान आणि इतर सर्व विज्ञान विषयांमधील पारंपरिक आणि आधुनिक विज्ञानाशी संबंधित शोधनिबंध संमेलनामध्ये सादर केले जातील. इंग्रजीप्रमाणे भारतीय भाषांमधून शोधनिबंधांचे सादरीकरण हे विज्ञान संमेलनाचे वैशिष्ट्य असेल. शास्त्रज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, सिटिझन सायन्स विषयावरील कार्यशाळा व आकाशदर्शन इत्यादी कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे.

‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र पाहायचे आहे? 
देशाच्या वैज्ञानिक आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र, ‘डीआरडीओ’ने विकसित केलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे या ‘एक्‍स्पो’त जवळून पाहता येतील. ‘मेक इन इंडिया’अभियानांतर्गत कल्याणी ग्रुपने विकसित केलेली हॉवित्झर श्रेणीतील ‘भारत’ ही अत्याधुनिक तोफ पुणेकरांना प्रथमच पाहता येणार आहे. ‘एक्‍स्पो’ सर्वांसाठी मोफत खुले आहे. भारतीय विज्ञान संमेलनात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्‍यक आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी www.bvsvibha.org ही वेबसाइट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The opportunity to see the BrahMos missile