चपात्यांमुळे महिलांना रोजगाराची संधी 

चपात्यांमुळे महिलांना रोजगाराची संधी 

पिंपरी - कामगार व विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या, तसेच नोकरदार महिलांना घरकामासाठी मिळणारा अपुरा वेळ यांमुळे बाहेरच्या घरगुती जेवणाला मागणी वाढू लागली आहे. विशेषतः तयार चपात्या खरेदीकडे महिलांचा वाढता कल लक्षात घेता अशा केंद्रांची संख्या वाढू लागली आहे. त्यातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

पोळी किंवा चपाती ही मध्यमवर्गीयांच्या खाद्यसंस्कृतीत पक्की रुजलेली गोष्ट. मात्र, वेळेअभावी नोकरदार महिलांना रोज चपात्या लाटणे जिकिरीचे काम वाटते. घरी कामगार महिला ठेवण्यापेक्षा बाहेरच्या केंद्रातून चपात्या खरेदीला त्या पसंती देऊ लागल्या. त्यामुळे अशा केंद्रात अनेक स्त्रियांना रोजगार मिळाला. एकट्या संत तुकारामनगरमध्ये 13 चपाती केंद्र आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात अशी सुमारे दोनशेहून अधिक पोळी भाजी केंद्रे असल्याची माहिती संत तुकारामनगरमधील एका केंद्रचालकाने दिली. एका चपातीची किंमत तीनपासून पाच रुपयांपर्यंत असते. परिसर, मागणी याप्रमाणे दर बदलत राहतात. 

या व्यवसायात प्रारंभी चपाती-भाजीचे डबे घेणाऱ्या ग्राहकांमध्ये नोकरदार, परगावचे विद्यार्थी यांचे प्रमाण जास्त होते. आता नोकरदार तरुण जोडपी यांच्याबरोबरच एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची संख्याही वाढू लागली आहे. रुग्णालये, हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळींना चपात्या पुरवण्यात येतात. काही मालवणी हॉटेलांमध्ये चपात्या करणाऱ्या महिलांना तासाच्या हिशेबावर बोलावले जाते. 

या केंद्रांवर एका छोटेखानी स्वयंपाकघरात रोज सुमारे तीन हजार चपात्या लाटल्या जातात. या केंद्रांवर सकाळी आठपासून दुपारी दोनपर्यंत, तर सायंकाळी सहापासून रात्री दहापर्यंत चपात्या केल्या जातात. त्यामुळे केंद्रातील कामगार महिलांना घर सांभाळून नोकरी करणे सोयीचे ठरते. 

एका केंद्राची स्थिती 
रोज तयार होणाऱ्या चपात्या : 3 हजार 
चपातीची किंमत : 3 ते 5 रुपये 
रोज लागणारे गव्हाचे पीठ : 90 किलो 
प्रतिदिन लागणारे तेल : 5 ते 8 लिटर 
महिला कामगार : 20 
महिलांचे मासिक वेतन : 11, 500 रुपये 

केंद्रावर काम मिळाल्यापासून श्रमही कमी झालेत आणि रोजगारची रक्कमही चांगली मिळतेय. 
- भावना आल्हाट, कामगार 

नोकरीमुळे आम्हा दोघांनाही वेळ मिळत नाही. अशावेळी चपाती भाजी केंद्राचा मोठा उपयोग होतो. 
- नीलेश व दीपाली सडोलकर, दांपत्य 

सुरवातीला महाविद्यालयीन मुलांसाठी डबे देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. नंतर चपातीच्या वाढत्या मागणीमुळे चांगल्या कामगारवर्गामुळे केंद्रच सुरू केले. 
- सोनल परबते, केंद्र संचालिका, संत तुकारामनगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com