विरोधकांची आघाडी अपरिहार्य  - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे - ""भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही. मात्र, प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊन जागावाटपाचे गणित सोडविता येईल. पक्षांचा जनाधार पाहता त्या-त्या राज्यांत त्यांना झुकते माप द्यावे लागेल, अशी भूमिका मांडतानाच विरोधकांची आघाडी अपरिहार्य आहे, '' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.  राफेलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन हे "ब्र'ही का काढत नाहीत, असाही सवाल त्यांनी केला. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकरिता शिबिर घेण्यात आले. त्या वेळी पवार बोलत होते. पक्षाचे नेते अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी या वेळी उपस्थित होते. 

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपविरोधकांना एकत्र आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दोन्ही कॉंग्रेसमध्ये आघाडीची चर्चा असून, या पक्षांच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत. देशातील प्रमुख विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर आघाडी अपरिहार्य असल्याचे जाहीर करीत, पक्षांच्या ताकदीनुसार त्यांना प्राधान्य देण्याची भूमिका पवार यांनी मांडली. निवडणुकांच्या तोंडावर भाजप जाणीवपूर्वक राममंदिराचा मुद्दा वापरत असल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. 

पवार म्हणाले, ""भाजप सरकारवर आरोप होऊनही वास्तव सांगण्याचे धाडस या पक्षाचे नेते करीत नाहीत. रोजगारनिर्मिती करण्याच्या उद्देशाने योजना आखल्या, त्यांचा गवगवा करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र परिणाम काही दिसत नाहीत. देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. गेल्या चार वर्षांत योजना रंगविण्यात आल्या असून, त्यांच्या अंमलबजावणीच्या पातळीवर भाजपला अपयश आले आहे. सत्ताधारीच लोकांवर अन्याय करीत आहेत. लोकांना पर्याय हवा आहे, तो देण्याकरिता समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. '' 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावरही पवार यांनी टीकास्त्र सोडले. 

Web Title: opposition alliance of necessity says sharad pawar