उद्धव जी, उद्या फडणवीस येणार; तुम्ही कधी? : पुणेकरांचा सवाल

opposition leader devendra fadnavis to visit corona affected pune
opposition leader devendra fadnavis to visit corona affected pune

पुणे : कोरोनाच्या आपत्तीमध्ये पुणेकर होरपळून निघाल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुमारे तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच मंगळवारी पुण्यात येत आहेत. या पूर्वी फडणवीस हे महिन्यातून किमान दोन वेळा तरी शनिवारी- रविवारी पुण्यात येत असे. फडणवीस पुण्यात येत असले तरी कोरोनाचा फटका बसलेल्या पुण्याला मुख्यमंत्री कधी भेट देणार?, असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री पदावर असताना फडणवीस यांचे पुण्यावर बारकाईने लक्ष होते. पुण्यातील बित्तंबातमी समजली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे पुण्यातील सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना ते आवर्जुन उपस्थित राहत असे. पुण्यातील अधिकाऱयांच्या नियुक्त्याही त्यांना मुखोदगत होत्या. त्यामुळेच त्यांचे पुण्यावर विशेष लक्ष होते. परंतु, पुण्यात 9 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर ही संख्या वाढतीच आहे. या कालावधीत भाजपचे जबाबदार नेते, माजी मुख्यमंत्री म्हणून एकदाही ते पुण्यात आले नाहीत. तसेच राज्यात मुंबई खालोखाल पुण्यात रुग्णांची संख्या का वाढत आहे, याची त्यांनी एकदाही चौकशी केली नव्हती.

मुळात कोरोनाच्या लॉकडाउन काळात मंत्र्यांचे दौरे रद्द करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुण्याचा दौरा केलेला नाही. त्यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणाला भेट दिलेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठका घेतल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही वादळाचा फटका बसलेल्या भागाचा दौरा वगळता महाराष्ट्रात इतर ठिकाणी दौरा केलेला नाही. आता देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यानंतर मात्र, इतर नेत्यांच्या पुणे दौऱ्याकडे लक्ष लागणार आहे. 

भाजपची सूत्रे चंद्रकांत पाटील यांच्याकडे
पुण्यातील भाजपची सूत्रे फडणवीस यांच्याकडून आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेली आहेत. त्यामुळेच फडणवीस यांनी पुण्यात अलिकडे येणे टाळले, अशी पक्ष वर्तुळात चर्चा आहे. तसेच टिडीआर पॉलिसी ही फडणवीस यांनी केली होती. परंतु, महापालिकेतील भाजपच्याच परंतु, सध्या चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्त्व मानणाऱया पदाधिकाऱयांनी त्या पॉलिसीमध्ये बदल करण्याचा घाट घातला अन त्यात ते यशस्वी झाले. ही बाबही फडणवीस यांना खटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे फडणवीस पुण्यापासून दूरच राहिले होते. या पार्श्वभूमीवर ते 23 जून रोजी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये येत आहेत. 

फडणवीस हे मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला भेट देतील.त्यानंतर दुपारी दोन वाजता महापालिकच्या नायडू रुग्णालयात येतील. त्यानंतर दुपारी सव्वा तीन वाजता विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेणार आहेत. सायंकाळी सहा वाजता आपटे रस्त्यावर एका हॉटेलमधील कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. ते पुण्यात मुक्काम करण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत असून त्याबाबत शासकीय दौऱयात काही उल्लेख केलेला नाही. दरम्यान, फडणवीस हे मंगळवारी पुण्यात येणार म्हणून महापालिकेच्या पदाधिकाऱयांची सोमवारी जोरदार तयारी सुरू होती तर, प्रशासकीय स्तरावरही धावपळ सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com