आळंदीत कोविड सेंटर सुरु करण्याचे आदेश मात्र, अद्याप कार्यवाही नाहीच

विलास काटे
Wednesday, 16 September 2020

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत शुक्रवारी (ता.१८ )घरोघरी आरोग्य तपासणीचे काम सुरू केले जाणार आहे. खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी (ता.१०) झाली.

आळंदी : खेड प्रांताधिकारी यांनी आळंदीतील देहूफाट्यावरील एमआयटी महाविद्यालयातील कोविड सेंटर सुरू करण्याबाबतच्या आदेश तहसिलदार आणि गट विकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना आठवड्यापूर्वीच दिल्या. मात्र, अद्याप आळंदीतील कोविड सेंटर सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेच चित्र आहे. कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत असताना सुरूवातीला आदेश नाहीत असे म्हणणारे प्रशासन आता आदेश मिळूनही कोविड सेंटर सुरू करत नसल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत शुक्रवारी(ता.१८)घरोघरी आरोग्य तपासणीचे काम सुरू केले जाणार आहे. खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी (ता.१०) झाली. यावेळी तहसिलदार सुचित्रा आमले, गट विकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे, डॉ.एम.बी.कणकवळे, डॉ.दिपक मुंढे, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नानासाहेब कामठे यांची उपस्थिती होती. 

खेड तालुक्यात चार हजार दोनशेहून अधिक कोरोनाचे रूग्ण आढळून आले. यावर उपाय योजनेसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी आळंदीतील कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचना प्रांताधिकारी श्री. तेली यांनी दिल्या.याची जबाबदारी तहसलिदार सुचित्रा आमले, गट विकास अधिकारी अजय जोशी आणि मुख्याधिकारी अंकूश जाधव यांच्यावर आहे. तसेच कोविड सेंटरसाठी आवश्यक साफसफाई, भोजन व्यवस्था, लॉंड्री, औषधे, पिपीई किट, सॅनिटायझर, हॅन्ड वॉश, या सुविधा तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी द्यायच्या आहेत. 

आळंदीत माझे कुटूंब माझी जबाबदारी अंतर्गत आठ हजार कुटूंबांचा सर्वे करण्यासाठी पालिकेकडे लिपिक वर्गाचे पस्तीस कर्मचारी आहेत. सहायक वर्गाचे पंच्चाहत्तर कर्मचारी आहेत. उर्वरित कर्मचारी तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांनी मदतीसाठी द्यायचे आहे. शहरासाठी शंभर शिक्षकांकडून यापूर्वी सर्वेक्षण केले होते. आता पुन्हा शहर सर्वेक्षण केले जाणार असून यासाठी ऑक्सीमिटर, थर्मल स्कॅनर पालिका खरेदी करणार आहे. सर्वेक्षणासाठी दहा टीमसाठी एक पर्यवेक्षकाची नेमणूक केली आहे. पंच्च्यान्नव पेक्षा ऑक्सीजनची पातळी कमी असलेल्या व्यक्तींना त्वरित कोविड सेंटर मध्ये अँटीजन तपासणीसाठी कार्यवाही करण्याचे आदेश आहेत. बाधित रूग्ण आढळल्यास त्यास त्वरित रूग्णालयात दाखल करण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध केल्या जाणार आहेत. आळंदीत देहूफाटा येथे एमआयटी महाविद्यालयाचे होस्टेलचे अधिग्रहण प्रशासनाने केले. त्याठिकाणी बेड,गाद्या,ऑक्सीमिटरसारखी साधने पडून आहेत. सुमारे एकशे ऐंशी बेड असलेले सुसज्ज आणि आजूबाजूला स्वच्छता असलेले सेंटर आहे. मात्र प्रांताधिकारी तेली यांनी आदेश देवूनही अद्याप कार्यवाही झाली नाही. यामुळे देहूफाट्यावरील कोविड सेंटर अद्याप सुरू नाही. 

हे वाचा - पुण्याचा चिराग फलोर "जेईई'मध्ये देशात बारावा; दिल्ली एनसीटीमध्ये प्रथम

आळंदी विकास मंचचे कार्यकर्ते संदिप नाईकरे आणि नगरसेवक सचिन गिलबिले यांनी सांगितले की, आळंदी शहरात लग्न आणि अस्थिविसर्जनासाठी पुणे पिंपरीतून येणाऱ्या लोकांमुळे तसेच कामगार वर्ग एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच कोविड सेंटर तयार असून सुरू नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. खेड जुन्नर आंबेगाव भागातीन अनेक पुढाऱ्यांनी स्वताच्या भागात लक्ष देवून कोविड सेंटर उभारले. मात्र आळंदी सारख्या तिर्थक्षेत्राला कोणी पुढारी वाली नसल्यानेच आळंदीकर आणि वारकऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत मुख्याधिकारी अंकूश जाधव यांनी सांगितले, ''मला याबाबतचे कोणतेही आदेश मिळाले नाही. मी स्वत: बैठकीला उपस्थित नव्हतो. याबाबत ग्रामीण रूग्णालयात माहिती मिळेल. दरम्यान शुक्रवारी (ता.१८) आणि शनिवारी (ता.१९) आळंदीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी सर्वेक्षण केले जाणार आहे. याबाबतचे प्रशिक्षण शिक्षकांना आज देण्यात आले.

बारामतीकरांना मिळतोय दिलासा! एवढे कोरोना रुग्ण झाले बरे

याबाबत तहसिलदार सुचित्रा आमले यांनी सांगितले, प्रस्ताविक ठेवले होते. आरोग्य विषयक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपलब्धतेबाबत अडचण आहे. जिल्हापरिषदेकडून आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता झाल्यावर कोविड सेंटर सूरू करता येईल. सध्या खेड तालुक्यातील चांडोली येथे कोविड सेंटर कार्यरत असून आळंदीतून येणाऱ्या रूग्णांना सेवा दिली जात आहे. कर्मचाऱ्यांची पूर्तता झाल्यानंतर आळंदीत कोविड सेंटर सुरू केले जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the order of Alandi Kovid Center has not been acted upon