पाण्याबाबत उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे प्रशासनाचे आदेश

‘सकाळ’ने आज (ता. २५) ‘समान’ तहान! उपनगरांत जिवाचं पाणी, पाणी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करत शहराच्या सर्व भागातील विदारक स्थिती समोर आणली आहे.
Water
WaterSakal
Summary

‘सकाळ’ने आज (ता. २५) ‘समान’ तहान! उपनगरांत जिवाचं पाणी, पाणी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करत शहराच्या सर्व भागातील विदारक स्थिती समोर आणली आहे.

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील पाणी पुरवठ्याचा (Water Supply) प्रश्‍न (Issue) गंभीर झाल्याने पाणी पुरवठा विभागासह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून समाविष्ट २३ गावांमधील पाण्याची स्थिती काय आहे? याची माहिती आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी मागवली आहे. शहरात पाण्याची समस्या का निर्माण झाली आहे, असा प्रश्‍नही अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.

‘सकाळ’ने आज (ता. २५) ‘समान’ तहान! उपनगरांत जिवाचं पाणी, पाणी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करत शहराच्या सर्व भागातील विदारक स्थिती समोर आणली आहे. रात्री अपरात्री पाणी येणे, कमी दाबाने पाणी येणे, टँकरसाठी सोसायट्यांना हजारो रुपयांचा करावा लागणार खर्च, काही भागांत गढूळ पाण्याचा पुरवठा होणे अशा अनेक समस्या आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये महापालिकेची यंत्रणा नसल्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी पाणी पुरविणे अपेक्षीत आहे, पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल होत असल्याची वस्तुस्थिती मांडली.

‘सकाळ’च्या या वृत्ताची दखल घेऊन आयुक्त विक्रम कुमार यांनी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आणि ‘पीएमआरडीए’चे अधिकारी विवेक खरवडकर यांच्याकडे पाणी समस्येबाबत चौकशी केली. धरणातून पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू असताना शहराच्या विविध भागात पाणी व्यवस्थित का मिळत नाही, अशी विचारणा केली, तसेच ही पाणी समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना सुरू आहेत, याची माहिती तातडीने सादर करा, असे आदेश दिले आहेत.समाविष्ट २३ गावांमधील सोसायट्यांना पाणी पुरवठा संबंधित विकसकाकडून करणे आवश्‍यक आहे. महापालिकेने त्याबाबत ‘पीएमआरडीए’सोबत बैठक घेऊन त्यासंदर्भात आदेशही दिले आहेत. तरीही बांधकाम व्यावसायिकांकडून किती सोसायट्यांना पाणी पुरवठा केला जात नाही, याची माहिती सादर करा, असे आयुक्त कुमार यांनी खरवडकर यांना सांगितले आहे.

प्रामाणिकपणे कर भरतो, तरी जीवनावश्यक पाण्याचा पुरवठा होत नाही. महापालिकेकडे जावे तर कोणीच दाद देत नाही. टॅंकरवर किती दिवस भागवणार, असा प्रश्न पुणेकर नागरिक विचारत आहे. ‘सकाळ’कडे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आलेल्या निवडक प्रतिक्रिया...

नियमित पाणीपट्टी भरून आणि अनेकवेळा तक्रारी करूनसुद्धा आमच्या महात्मा सोसायटी परिसरात अनियमित पाणीपुरवठा आहे. कित्येक वेळेस पाणीकपातीस सामोरे जावे लागत आहे. अधिकाऱ्यांनी त्वरित योग्य तो कायमस्वरूपी तोडगा काढावा.

- अभिताभ होनप, कोथरूड

आमच्याकडे पाण्याचा अपुरा पुरवठा होतो. पाणी नसल्यामुळे खूप हाल होतात. कित्येक वेळा टँकर मागवावा लागतो. महापालिकेकडे तक्रार केली की, तेवढ्यापुरता दोन दिवस पुरवठा सुरळीत होतो. कृपया माझी तक्रार या निर्ढावलेल्या प्रशासनापर्यंत पोहोचवावी.

- हृषीकेश गोसावी, साईसमर्थ शिल्प सोसायटी, डीएसके विश्व रस्ता, धायरी

फुरसुंगी, भेकराईनगर या उपनगरात आठवड्यातून दोन तासही पाणीपुरवठा होत नाही. ग्रामपंचायत होती त्या वेळेस नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात जात होते, आता तीही सोय नाही. करवसुली मात्र शहरी करसंकलन प्रणालीनुसारच होत आहे.

- योगेश टेकवडे, फुरसुंगी

बाणेर-पाषाण लिंक रस्ता परिसरात कमी दाबाने आणि कमी वेळेसाठी पाणीपुरवठा होत आहे. सुमारे ६० सोसायट्यांच्या या परिसरात टॅंकरची चलती आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही फरक पडलेला नाही. धरणात पाणी असूनही पुरवठा विस्कळित का होत आहे, असा प्रश्न आहे.

- राजेंद्र चुत्तर, अध्यक्ष, बाणेर-पाषाण लिंक रस्ता वेल्फेअर ट्रस्ट

आमच्या सोसायटीला गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचा पाणीपुरवठा होत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही कोणी अधिकारी लक्ष देत नाहीत. सर्व सोसायटी सभासद नियमीत महापालिकेला कर भरत असताना आम्हाला आमच्या हक्काचे पाणी का मिळत नाही?

- रहिवासी, ऑरेंज काऊंटी, फेज- २, बाणेर- पाषाण लिंक रस्ता, पाषाण

शहराच्या प्रत्येक भागात समसमान पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे स्वप्न महापालिकेमार्फत दाखविण्यात येत आहे. मोठमोठे आकडे समोर ठेवून प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे.

- ज्ञानेश्वर हेडाऊ, फोर्चून इस्टेट सोसायटी, हडपसर

मागील काही वर्षांपासून समान पाणीपुरवठा योजना जाहीर करण्यात आली आहे, पण अजूनही हा निर्णय पूर्ण होत नाही. ज्या तत्परतेने महापालिकेकडून घोषणा करण्यात येतात, त्याच तत्परतेने या योजनेचा लाभ जनसामान्यांना झाला तर खूपच छान.

- रोहन पगारे, धनकवडी

२०१७ पासून आमचा भाग पुणे महापालिकेत समाविष्ट झाला आहे, परंतु अद्यापपर्यंत आमच्याकडे पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध झालेली नाही. यामुळे आम्हाला दररोज स्वखर्चातून टॅंकरद्वारे पाण्याची सोय करावी लागत आहे. दर महिन्याला पाण्यावर जवळजवळ १५ ते २० हजार रुपये खर्च होत आहे.

- अमोल तुपे, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द

नागरिकांनो जागे व्हा...

पाणीपुरवठ्यासंदर्भात तसेच फ्लेक्समुळे होणाऱ्या शहर विद्रूपीकरणाबाबत तुमच्या परिसरात काय परिस्थिती आहे, याबाबत आपल्या प्रतिक्रिया editor.pune@esakal.com यावर किंवा ८४८४९७३६०२ या क्रमांकावर पाठवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com