तलाठ्यांच्या दफ्तरतपासणीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

नागरिकांची अडवणूक करणे अयोग्य आहे. त्यामुळे गंभीर दखल घेऊन तलाठी कार्यालयांची दफ्तरे तपासावीत, असे आदेश दिले आहेत. 
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

पुणे - ‘मेवा दिल्याशिवाय सेवा नाही’, ‘भेटल्याशिवाय काम नाही’, ‘हात ओले केल्याशिवाय नोंद नाही’ अशा प्रकारे कारभार सुरू असलेल्या तलाठी कार्यालयांच्या कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, तलाठी कार्यालयांच्या दफ्तरतपासणीचे आदेश दिले आहेत.

हवेली तहसीलदार कार्यालय, तसेच उपनगरातील तलाठी कार्यालयांमध्ये कशा प्रकारे कारभार चालतो, कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्या त्रासाला तोंड द्यावे लागते होते, याबाबतच्या तक्रारी ‘सकाळ’ कार्यालयाकडेदेखील आल्या होत्या. ‘सकाळ’ने याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर अनेकांनी ‘सकाळ’ कार्यालयाशी संपर्क साधून यासंदर्भात आलेले अनुभव सांगितले. तसेच, या वृत्ताची दखल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीदेखील घेतली. तलाठी कार्यालयाची दफ्तरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

नागरिकांना वेळेत सेवा मिळावी, यासाठी राज्य सरकारने सेवा हमी कायदा लागू केला आहे. त्यानुसार कोणते काम किती दिवसांत होईल, हे नमूद केले आहे. मात्र, कायद्याला बगल देऊन नागरिकांची अडवणूक केली जात होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरू केलेल्या या तपासणीमुळे तलाठी आणि सर्कल यांचे धाबे दणाणले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order of office inspection of Talathis