दोन पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे - सरकारची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकासह चौघांविरुद्ध कारवाई करण्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांनी कसूर केली. त्यामुळे पोलिस निरीक्षकासह महिला पोलिस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याचा आदेश विभागीय पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाने गृहविभाग व पोलिस आयुक्तांना दिला आहे.

बांधकाम व्यावसायिक केतन विरा व अन्य चौघांनी भवानी पेठेतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) एका इमारतीमध्ये नियमांचे उल्लंघन करून वीजजोड घेत सरकारची फसवणूक केली होती. त्याविरुद्ध शब्बीर दादामियाँ शेख यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी दोषींवर कारवाई होण्यासाठी शेख यांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते व महिला पोलिस उपनिरीक्षक गिरिजा म्हस्के यांच्यासह संबंधित विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. अखेर शेख यांनी न्यायासाठी प्राधिकरणामध्ये धाव घेतली. 

पोलिस अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून संशयित आरोपींवर गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करणे, अजामीनपात्र गुन्हा असूनही आरोपींना अटक न करणे, नियोजित कालावधीत आरोपपत्र दाखल न करणे, अपिलावरील सुनावणीस हजर न राहणे, असे आरोप करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आदेश प्राधिकरणाने दिला. प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. पी. जोशी,   सदस्य सी. जी. कुंभार व बी. जी. गायकर यांच्या आदेशान्वये मोहिते व म्हस्के यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पुणे पोलिस आयुक्त यांना दिला आहे.

Web Title: order to take action against two police officers