'अवयवदानाची चळवळ समाजात रुजण्याची गरज'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

पुणे - ‘‘एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या अवयवांचे दान करून दुसऱ्या व्यक्तीला जीवदान देणे हे एक महान कार्य आहे. समाजोपयोगी कार्याबद्दल लोकांच्या मनात असलेल्या विविध शंकांचे समाधान करत अवयवदान ही चळवळ समाजात रुजविली पाहिजे,’’ असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी व्यक्त केले.    

पुणे - ‘‘एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या अवयवांचे दान करून दुसऱ्या व्यक्तीला जीवदान देणे हे एक महान कार्य आहे. समाजोपयोगी कार्याबद्दल लोकांच्या मनात असलेल्या विविध शंकांचे समाधान करत अवयवदान ही चळवळ समाजात रुजविली पाहिजे,’’ असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी व्यक्त केले.    

रुबी हॉल क्‍लिनिकतर्फे आयोजित कार्यक्रमात जिवंतपणी किंवा मरणोत्तर अवयवदान करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, क्‍लिनिकचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त डॉ. परवेझ ग्रॅंट, मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, वैद्यकीय सेवा संचालक डॉ. संजय पठारे, डॉ. जगदीश हिरेमठ, वैद्यकीय समाजसेविका सुरेखा जोशी, आयएमए पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे, रिबर्थ फाउंडेशनचे संचालक राजेश शेट्टी, होप अँड केअरच्या मनीषा मद्देल आणि रोटरी क्‍लब ऑफ पूना डाउन टाउनच्या अध्यक्ष पल्लवी साबळे उपस्थित होत्या. 

टिळक म्हणाल्या, ‘‘आरोग्य क्षेत्रात काम करण्यात भरपूर वाव आहे. अवयवदानासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांबाबत पुढील काळात अधिक जनजागृती केली पाहिजे. विशेषत: त्वचादानाबाबत आणि त्यासाठी वैद्यकीय, स्वयंसेवी संस्थांच्या बरोबरीने महापालिकादेखील आवश्‍यक ते कार्य करेल.’’

शुक्‍ला म्हणाल्या, ‘‘अवयवदान हा समाजकार्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य आनंददायी करणाऱ्या या उपक्रमाची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाने समाजाच्या हितासाठी अशाप्रकारचे योगदान द्यावे.’’

या वेळी अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी डेक्कन जिमखाना ते टिळक स्मारक मंदिर अशा रॅलीचे आयोजन केले होते. तसेच क्‍लिनिकने तयार केलेल्या ‘अवयवदान ॲप’चे महापौरांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.   सुविधा राजवाडकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. शीतल धडफळे-महाजनी यांनी आभार मानले. 

Web Title: Organ donation movement need in the society