'त्या' अनाथ जिवाची अखेर शवागरातच 

girl
girl

पिंपरी : बालपणापासून ती अनाथ. मावशीनं सांभाळ केला. शिक्षणासाठी शहरात आली. कुटुंबावर आर्थिक भार नको, म्हणून एका मॉलमध्ये नोकरीला लागली. नोकरीत एकाशी झालेल्या ओळखीतून तिनं 'त्याला' सगळं लहानपण, अनाथपण सांगितलं. ही संधी साधून त्याने प्रेमाचं नाटक रचलं. यातच 'ती' फसली. कधी सर्वस्व बहाल केलं हे आंधळ्या प्रेमामुळे कळलंच नाही. अखेर नको तेच झाले. लग्नाच्या आणाभाका करणाऱ्याने नकार दिल्याचा धक्का 'तिला' सहन झाला नाही. विषारी औषध प्राशन केलं. दोन दिवसांनी तिची तडफड संपली. तिचा मृतदेह अनाथ म्हणून शवागारात पडून आहे. 

काळीज हेलावून सोडणारी ही घटना काळेवाडी- नढेनगरातील. वैशाली राजू गवळी (वय 25) असे तिचे नाव आहे. ती मूळची नगर जिल्ह्यातील आहे. मात्र, पोलिसांना गावची माहिती मिळत नाही. तिच्या नातेवाइकांचा पोलिस शोध घेत आहेत. सध्या तरी तिचा मृतदेह शवागारात राहील. नंतर मात्र कायदेशीर नियमाप्रमाणे 'बेवारस' म्हणून तिच्यावर अंत्यसंस्कार होतील. लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरवल्याने ती मावशीकडेच वाढली. नंतर शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आली. शिक्षण पूर्ण झाल्यावर मॉलमध्ये नोकरी मिळाली. अनाथपणामुळे बालपण सगळं करपलेलं. तारुण्यात "त्याची' भेट झाली. हरपलेलं प्रेम मिळालं, असा तिचा भ्रम झाला. अंतापर्यंत प्रेम करण्याच्या आणाभाका झाल्या. लग्नाचं वचन मिळालं. आणखी काय हवं होतं तिला. ती स्वप्नं रंगवत राहिली. तो फसवत राहिला आणि एक दिवस असा उगवला, की ती उद्‌ध्वस्तच झाली. कारण लग्नास त्याने नकार दिला. ती विनवणी करीत राहिली, तो धुडकावत राहिला. त्याच्या घरच्यानीही उडवून लावले. शेवटचा पर्याय म्हणून चिंचवड पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिथेही अशी काही वागणूक मिळाली की, अगोदरच संतापलेल्या जिवाचा भडका उडाला. ठाण्याच्या पायरीवर विषारी औषधाची बाटली घशाखाली रिकामी केली. पोटात आग होऊ लागल्याने मैत्रिणीला फोन लावला. सर्व परिस्थिती सांगितली. ती तिच्या मदतीला धावली. पोलिसांनी अधिक चौकशी न करता मैत्रिणीवरच राग काढून ताबडतोब रुग्णालयात नेण्यास सांगितले. तिला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस ती तडफडली. मात्र, भेटायला "तो' आलाच नाही. अखेर तिने चार एप्रिल रोजी प्राण सोडला. तिच्या असे अचानक जाण्याने मैत्रिणींना धक्का बसला. असंवेदनशील पोलिस यंत्रणा मात्र अद्याप ढिम्मच आहे. नातेवाइकांचा शोध सुरू आहे. एवढीच माहिती ते सांगतात. 

"ती' अबोलच राहिली... 
रुग्णालयात दाखल असताना चिंचवड पोलिस तिचा जबाब घेण्यासाठी आले. विषामुळे तोंड भाजून गेल्याने तिला बोलता येत नव्हते. तिने मैत्रिणींसमोर पोलिसांना आपण विष का प्यायलो, याबाबत लेखी जबाब लिहून दिला. आरोपीबाबत पोलिसांना माहिती असूनही तिच्या मृत्यूनंतरही पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केलेला नाही. यामुळे तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेला 'तो' अजूनही उजळमाथ्याने मोकाट फिरत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com