रूग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अस्थिव्यंग शल्य चिकित्सकास अटक  

प्रफुल्ल भंडारी
सोमवार, 9 जुलै 2018

दौंड (पुणे) : पाटस (ता. दौंड) येथील शेतकरी पोपट म्हस्के यांच्यावर हयगय आणि निष्काळजीपणे उपचार करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले अस्थिव्यंग शल्य चिकित्सक डॉ. संजय जयकर यांच्यावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. रूग्णास असलेल्या अॅलर्जीसंबंधी माहिती न घेता उपचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

दौंड (पुणे) : पाटस (ता. दौंड) येथील शेतकरी पोपट म्हस्के यांच्यावर हयगय आणि निष्काळजीपणे उपचार करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले अस्थिव्यंग शल्य चिकित्सक डॉ. संजय जयकर यांच्यावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. रूग्णास असलेल्या अॅलर्जीसंबंधी माहिती न घेता उपचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी आज (ता. ९) या बाबत माहिती दिली. १४ जानेवारी २०१६ ला पोपट कोंडिबा म्हस्के (वय ५५, रा. म्हस्के वस्ती, पाटस, ता. दौंड) यांना मधुमेह व डाव्या पायावर जखम झाल्याने त्यांच्यावर लिंगाळी येथील सावरकर नगर मधील जयकर रूग्णालयात उपचार सुरू होते. रूग्णास कोणत्या औषधाची व अन्य कोणत्या प्रकारची अॅलर्जी आहे ? या बाबत माहिती न घेता डॅा. संजय देविदास जयकर यांनी सलाईनद्वारे इंजेक्शन दिल्यानंतर पोपट म्हस्के यांचा मृत्यू झाला होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. दरम्यान पुणे येथील ससून सर्वोपचार रूग्णालयात शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. पोपट म्हस्के यांच्यावर मृत्यूपुर्वी करण्यात आलेल्या उपचारासंबंधी कागदपत्रे, व्हिसेरा संबंधी तपासणी अहवाल, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासमोरील अहवाल, आदींची तज्ञ समितीकडून तपासणी झाल्यानंतर औषधामुळे रिअॅक्शन होऊन पोपट म्हस्के यांचा मृत्यू झाल्याचा स्पष्ट अहवाल दौंड पोलिसांना ३० एप्रिल २०१८ ला प्राप्त झाला होता. सदर अहवाल सरकारी अभियोक्ता यांना सादर करून संबंधित डॅाक्टरवरील फौजदारी कारवाई करण्यासंबंधी अभिप्राय मागविल्यानंतर सरकारी अभियोक्ता यांनी भारतीय दंड विधान कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल होतो, असा अभिप्राय दौंड पोलिसांना दिला.

त्यानुसार रविवारी (ता. ८) दौंड पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार दिलीप भाकरे यांनी या प्रकरणी डॅा. संजय दोविदास जयकर (रा. सावरकर नगर, लिंगाळी) यांच्याविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. डॅा. जयकर यांना या प्रकरणी रविवारी संध्याकाळी अटक करून जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती दिलीप भाकरे यांनी दिली. 

Web Title: osteopathic surgeon who is responsible for the death of the patient is arrested