उदापूरला गाडीबगाडाचा थरार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

ओतूर - उदापूर (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. ८) कालाष्टमीनिमित्त ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व मुक्तादेवीच्या यात्रेत हजारो भाविकांनी देवाचे फिरते गाडी बगाड पाहण्यासाठी गर्दी केली होती. तसेच सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचं चांगभलं, अंबाबाईचा उदे उदेच्या घोषात तळी भांडार करून मंदिराच्या सभा मंडपातून मुक्तपणे खोबऱ्याची उधळण केली.      

याबाबत श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, ग्रामविकास मंडळ उदापूरचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे व माजी सरपंच बबन कुलवडे यांनी माहिती दिली. काळभैरवनाथाला ५१ ग्रामस्थांनी अभिषेक केला. त्यानंतर मांडवडहाळ्यासह पोशाख व पादुकांची गावातून मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. दुपारी चारच्या दरम्यान मारुती मंदिरापासून वाजतगाजत दोन बैलजोड्याच्या साह्याने गाडी बगाड मुख्य चौकात पाराजवळ आले. गाडी बगाडाच्या सुळ्याची उंची २१ फूट होती. त्यावर असलेल्या आडव्या आड्याची लांबी ४० फूट होती. आड्याच्या एका टोकाला बांधलेल्या छोळीत पुजारी बसलेले होता तर आड्याच्या दुसऱ्या बाजूकडील व्यक्तीला व दोराला धरून भाविकांकडून बगाड फिरवले जाते. गावातून बगाड श्री काळभैरवनाथ मंदिराजवळ आल्यानंतर परत येथेही बागड फिरवले गेले. त्यानंतर पुजारी मंदिरात जाऊन पूजा करून तळीभंडार केला. तसेच या वेळी भाविक भक्तही मोठ्या प्रमाणात तळीभंडार करून मंदिराच्या सज्ज्यातून भंडाऱ्याची व खोबऱ्याची मुक्त उधळण केली. 

मंदिराला फुलांची आकर्षक सजावट
श्री काळभैरवनाथ व मुक्तादेवी मंदिराला दादर फुलबाजार व श्री संत सावतामाळी मंडळ, मुंबई यांनी अंदाजे तीन लाख रुपये खर्च करून फुलांची आकर्षक सजावट केली होती. सजावट करण्यासाठी श्री संत सावतामाळी मंडळ मुंबईचे अध्यक्ष विष्णू शिंदे, दीपक भास्कर, निवृत्ती शिंदे, सुभाष शिंदे, रमेश शिंदे, संजय अमुप, मनोहर शिंदे, चंद्रकांत अमुप, संतोष शिंदे (वाडेकर) यांनी व दादर फुलबाजार मुंबईच्या सभासदांनी व उदापूर ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Web Title: Otur news gadibagada kalbhairavnath yatra