मेट्रो आमचा ध्यास अन्‌ श्वासही...

मेट्रो आमचा ध्यास अन्‌ श्वासही...

स्वारगेटचा कायापालट करणारा मल्टीमोडल हब हा देशातील एकात्मिक वाहतुकीचा सर्वोत्तम प्रकल्प ठरेल, हे मी आता पैज लावून सांगायला तयार आहे. भाजपने पुणेकर जनतेच्या दरबारात मेट्रोचे धनुष्य लीलया पेलून दाखविले. ते पेलताना असंख्य अडथळे आले. राजकीय विरोधकांनी चेष्टा केली. परंतु यावर मात करीत केंद्र, राज्य आणि महापालिकेतील आमच्या पक्षाच्या सरकारने हा प्रकल्प वेगाने पुढे नेला आहे.

त्यातील चिंचवड ते रेंजहिल्सचा पहिला टप्पा कार्यान्वित व्हायला आता दहाच महिन्यांचा कालावधी राहिला आहे. मेट्रोचे २८ टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. शहराच्या प्रत्येक भागात मेट्रोचे अस्तित्व दिसू लागल्याने पुण्याच्या अजेंड्यावर मेट्रो हाच एकमेव चर्चेचा विषय आहे. वित्तीय संस्थांचा पाठपुरावा करून या प्रकल्पाचा आम्ही एकोणीस टक्के अर्थपुरवठा करून दाखविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भूमिपूजन केलेल्या हिंजवडीच्या प्रकल्पाचा आराखडाही आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच नरवीर तानाजी रस्ता, हडपसर, वाघोली, कात्रज या चारही मार्गांवरील मेट्रोचे काम मार्गी लागलेले दिसेल. 

नदीकाठच्या रस्त्यावर स्कायवॉकची सुविधा द्यावी, शिवसृष्टीपर्यंत मेट्रो जावी, मेट्रोच्या सर्व मार्गांवर व्हर्टिकल गार्डनची हिरवळ दिसावी, हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. कारण मेट्रो आमचा ध्यास आहे. मेट्रो आमचा श्वास आहे. पिंपरी- चिंचवड, वनाज आणि रामवाडी या तीनही मार्गांवर सुमारे पाचशे खांब उभे राहिले आहेत. त्यावर आता साचे बसवून सेगमेंट तयारीचे काम सुरू झाले आहे. कोथरूड परिसरात त्याचा वेग अधिक आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा चोवीस किलोमीटरचा मार्ग २०२१ मध्ये कार्यान्वित होईल. त्यासाठी ६२१४ कोटी रुपयांचा निधीही केंद्राने मंजूर केला आहे. पब्लिक व प्रायव्हेट भागीदारीतून साकारला जाणारा पुण्यातील हा सर्वांत मोठा प्रकल्प ठरणार आहे. 

आम्ही शहराच्या पर्यावरण संतुलनालाही प्राधान्य दिले आहे. मेट्रोने औंध, तळजाई, रेंजहिल्स, आकुर्डी व पिंपरी- चिंचवड परिसरात सुमारे पंधरा हजार झाडे नव्याने लावली आहेत. प्रकल्पाच्या मार्गात येणारी ६५८ झाडे पुनर्रोपणाद्वारे ठिकठिकाणी जोमाने वाढत आहेत. 

संभाजी पार्क, डेक्कन जिमखाना ही दोन स्थानके पुणेरी पगडीच्या आकारात साकारली जाणार आहेत. त्यातून पुण्याचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा प्रतिबिंबित होईल. चिंचवड ते स्वारगेट हा १६.५९ किलोमीटर लांबीचा मार्ग पाच किलोमीटरच्या भुयारी मार्गामुळे प्रवाशांचे आकर्षण ठरेल. भुयारी मार्गाचेही काम झपाट्याने चालू झाले आहे. रेंजहिल्सपर्यंतच्या स्थानकांचे काम कंत्राटदाराने सुरू केले आहे. 

स्वारगेट येथील नियोजित स्थानकाचा ताबाही मेट्रोला मिळाला आहे. शिवाजीनगर येथील धान्याची चार गोदामे इतरत्र हलवून ती जागाही मेट्रोकडे हस्तांतरित झाली आहे. आम्ही जाहीर केलेल्या वचननाम्यानुसार या वर्षअखेरीला पुणेकर काही प्रमाणात मेट्रोतून प्रवास करू लागतील. टाटा आणि सिमेन्स कंपनीबरोबर झालेला सामंजस्य करार आणि एएफडी फ्रान्स बॅंक व केंद्र सरकार यांच्यात मेट्रोच्या उभारणीसाठी झालेला दोन हजार कोटी रुपयांचा करार ही या प्रकल्पाची सर्वांत मोठी कामगिरी मानली जाते. सिग्नलिंगचे काम अलस्टाँम या कंपनीला मिळाल्याने फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. स्थानिकांनाच प्राधान्याने काम देण्याचे धोरण स्वीकारल्याने युवकांच्या हाताला भरपूर काम मिळाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com