आमची रणनीती - माझा पक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

कोपरा सभा आणि पदयात्रा
विनायक निम्हण (शहरप्रमुख, शिवसेना)

सभा, कोपरा सभा, मेळावे, भाजप सरकारच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीची माहिती देणारी पुस्तिका, पत्रके आदी गोष्टींचे नियोजन करून महापालिकेच्या निवडणूक प्रचारात बार उडवून देण्याचे नियोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोपरा सभा आणि पदयात्रा
विनायक निम्हण (शहरप्रमुख, शिवसेना)

सभा, कोपरा सभा, मेळावे, भाजप सरकारच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीची माहिती देणारी पुस्तिका, पत्रके आदी गोष्टींचे नियोजन करून महापालिकेच्या निवडणूक प्रचारात बार उडवून देण्याचे नियोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

पक्षाच्या ठरलेल्या नियोजनानुसार उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. उमेदवारांकडून पदयात्रांवर भर देण्यात येत आहे. पक्षाच्या नेतेमंडळीकडून प्रभागात कोपरा सभा, गाठीभेटी घेऊन त्याला हातभार लावला जात आहे. याशिवाय पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा बुधवारी (ता. १५) होणार आहे. युवानेते आदित्य ठाकरे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचाराचा एक भाग म्हणून पक्षाकडून नोटाबंदीवरील एक सोळा पानी पुस्तिका, चार पानी दोन प्रचारपत्रके तयार करण्यात आली आहेत. 

नोटाबंदीविषयी पक्षाची भूमिका, देशातील अर्थतज्ज्ञांनी त्यावर केलेले भाष्य यांचा समावेश त्यात आहे. या पुस्तिकेसह ‘वाचा आणि विचार करा’ या नावाचे माहितीपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा कारभार, भाजपचे नगरसेवक, खासदार आणि आमदार यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. दुसऱ्या पत्रकात शिवसेना हाच पर्याय कसा आहे, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रत्येक उमेदवाराला या प्रचार साहित्याच्या प्रती पोचविण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत शिवसेनेची भूमिका पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सक्रिय व्हावेत, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

----------------------------------------------------------

प्रचारासाठी  कोअर कमिटी

रमेश बागवे (शहराध्यक्ष, काँग्रेस)

महापालिकेच्या निवडणुकीत प्रमुख नेत्यांच्या सभा, पदयात्रा आणि सोशल मीडिया यावर काँग्रेसच्या प्रचाराची भिस्त असेल. विकासाच्या मुद्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी ही निवडणूक लढविणार आहे. या निवडणुकीत प्रथमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काही जागांवर निवडणूकपूर्व आघाडी केली. तर, काही प्रभागांमध्ये मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. 

महापालिकेची ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढविण्यात येणार आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना पुण्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून नियमित निधी दिला होता. आता भाजप सरकारने गेल्या दोन-अडीच वर्षांत दिलेल्या निधीचीही माहिती प्रचारातून मतदारांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे.

काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांच्या सभांवरही भर दिला जाणार आहे. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश आहे. याबरोबरच पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत उमेदवार पोचणार आहेत. तसेच कोपरा सभा, पदयात्रा आणि घरोघरी संवाद सुरू आहे. 

आघाडीच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांतील नेत्यांची ‘कोअर कमिटी’ तयार करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून प्रचार यंत्रणा सक्रिय होईल. सर्वाधिक कार्यकर्ते आणि जनाधार असलेला पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षाचे अध्यक्ष, ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष या माध्यमातून पक्ष संघटना सक्रिय झाली आहे.

----------------------------------------------------------

वैयक्तिक प्रचारावर भर
हेमंत संभूस (शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पदयात्रा, मेळावे, मतदारांशी घरोघरी संवाद यावर भर दिला जात आहे. सभांसाठी मैदानांची संख्या शहरात कमी आहे. त्यातच नव्या-नव्या शासकीय नियमांमुळे सर्वच राजकीय पक्ष अडचणीत आले आहेत. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यात होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही सभा येत्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. नदीपात्रात सभा घेता येणार नसल्यामुळे स.प. महाविद्यालयातील मैदानात ही सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्‍यक त्या परवानगीची पूर्तता केली जात आहे. सभेसाठी महाविद्यालयातील मैदानात न मिळाल्यास सरकारने दिलेल्या इतर जागांवर सभेचे नियोजन केले जाईल. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर यांच्याही दोन-तीन प्रभागांसाठी मिळून एक अशा विविध भागांत कोपरा सभा होतील, तसेच मनसेतर्फे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भव्य ‘रोड शो’चेही आयोजन होणार आहे. सध्या उमेदवारांच्या वैयक्तिक प्रचारावर पक्षाचा भर आहे. पदयात्रा, गाठी-भेटी, कोपरा सभा घेण्यात येत आहेत. या आठवड्यात प्रचाराचा जोर वाढेल. त्यासाठी पक्ष कार्यालयातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

----------------------------------------------------------

प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याची रणनीती
योगेश गोगावले (शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष)

केंद्रातील, राज्यातील नेत्यांच्या जाहीर सभांसोबतच हजारी यादीवर लक्ष केंद्रित करून मतदारांपर्यंत पोचण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. पूर्णवेळ कार्यकर्त्यांबरोबर परिवारातील कार्यकर्तेही अखेरच्या टप्प्यात प्रचारात सहभागी होणार आहेत. 
पक्षाचे केंद्र आणि राज्यातील अनेक केंद्रीय मंत्री प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात शहरात सहभागी होणार आहेत. पक्षाने या वेळी मध्यभाग, पर्वती विधानसभा मतदारसंघाबरोबरच खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, बाणेर - बालेवाडी, आदी उपनगरांवरही लक्ष केंद्रित केले आहे. प्रचारावर देखरेख करण्यासाठी पक्षाने प्रभागनिहाय यंत्रणा निर्माण केली असून, त्यावर मध्यवर्ती यंत्रणेचे बारकाईने लक्ष आहे. प्रचाराच्या घडामोडींची माहिती दररोज रात्री संकलित करून त्यानुसार प्रचाराचे नियोजन होत आहे. नेत्यांच्या जाहीर सभांबरोबरच प्रभागनिहाय मेळावे, कार्यकर्त्यांच्या बैठका, पदयात्रा, सोसायट्यांमध्ये मतदारांशी संवाद साधण्यावरही भर दिला जात आहे. या प्रक्रियेत पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते तसेच परिवाराच्या संघटनांमधील कार्यकर्ते आता शेवटच्या टप्प्यात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पक्षाच्या महिला, युवक, अनुसूचित जाती-जमाती, व्यापारी, आयटी आदी आघाड्या आणि सेलही सक्रिय झाले आहेत. हजारी यादी आणि त्यावर काम करणारे कार्यकर्ते, हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. मतदारांच्या घरांपर्यंत पक्षाचे पत्रक, उमेदवारांची माहिती पोचली की नाही, याची खातरजमा करण्याचीही यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत पोचण्याची यंत्रणा भाजपकडे आहे.

----------------------------------------------------------

मोठ्या नेत्यांच्या  सभांचे आयोजन

वंदना चव्हाण (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

महापालिकेत सत्ता असल्याने गेल्या दहा वर्षांत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची उभारणी केली असून, त्यामुळे शहराच्या विकासाला मोठा हातभार लागला आहे. शहर विकासाचा हा वेग कायम राहण्यासाठी महापालिकेत सत्ता आणण्याचा प्रयत्न आहे.  

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पदयात्रा, मेळावे, घरोघरी प्रचार यावर भर दिला जात आहे, तसेच कोपरा सभाही सर्वच प्रभागांत मोठ्या संख्येने होणार आहेत. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील आदी विविध नेते शहरात येणार आहेत. सोशल मीडिया, एलईडी व्हॅनच्या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोचण्यात येत आहे. मतदारांबाबत विकासकामांबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ३ ते १० मिनिटांच्या ‘क्‍लिप’ तयार करण्यात आल्या असून, त्या चौका-चौकात मतदारांना ऐकविण्यात येत आहेत. राज्यातील सत्ताधाऱ्यांना म्हणजे भारतीय जनता पक्षाला महापालिकेत सत्ता आणण्याचे स्वप्न पडत आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत पुणेकरांच्या हिताची एकही योजना या सरकारने मार्गी लावलेली नाही; परंतु मेट्रोसारख्या प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा मोठा खटाटोप करण्यात आला. सर्व घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्या कायमस्वरूपी सोडविण्याची दूरदृष्टी राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांकडे आहे. त्यासंदर्भात त्यांना विशेष प्रशिक्षण दिले असून, शहरातील मूळ प्रश्‍न आणि त्यावरील उपाययोजनांचे धडे देण्यात आले आहेत. शिवाय, सार्वजनिक हिताचे निर्णय घेताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे नेते अजित पवार यांची वेळोवेळी मदत घेतली जाते. त्यातून संबंधित प्रकल्पांना नेमकी दिशा मिळाली आहे. या पुढील काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचून शहराच्या विकासाचे चित्र त्यांच्यासमोर मांडले जाईल.

Web Title: Our strategy - my party