दोनशे कमाविण्याच्या नादात दहा हजार गमावले | Cheating | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cheating
दोनशे कमाविण्याच्या नादात दहा हजार गमावले

दोनशे कमाविण्याच्या नादात दहा हजार गमावले

आंबेठाण - औद्योगिक नगरी म्हणून जगात नावारूपाला आलेल्या चाकण एमआयडीसीत कामगारांची लुटालूट सुरू आहे. परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील कामगार हेरून त्यांना लुटल्याचे मोठे प्रमाण एमआयडीसी भागात अनुभवायला मिळत आहे. असाच एक प्रकार वासुली फाटा (ता. खेड) येथे घडला असून दोनशे रुपये कमाविण्याच्या नादात दहा हजार रुपयांचा भुर्दंड या परप्रांतीय कामगारांना बसला आहे.

याबाबत घटना अशी की,भामचंद्रनगर भागात नव्याने काही कामगार राहायला आले होते. बाहेर फिरायला गेले असता त्यांना चारचाकी गाडीतून आलेल्या एका भामट्याने किरकोळ किराणा माल गाडीत भरायचा आहे. त्याबदल्यात दोनशे रुपये देतो असे कामगारांना सांगितले. मोकळा वेळ आहे आणि प्रत्येकी दोनशे रुपये मिळतील म्हणून नव्याने या भागात आलेल्या चार कामगारांनी होकार दिला. त्यांना घेऊन संबंधित गाडीवाला एका किराणा दुकानात गेला. दरम्यानच्या काळात या चारचाकीवाल्या भामट्याने अगोदरच त्या दुकानाच्या बाजूला अजून चार कामगारांना असेच अमिष दाखवून उभे केले होते.

दुकानात गेल्यावर या भामट्याने दुकानदाराला बाजाराची भली मोठी यादी दाखविली. मोठे गिऱ्हाईक आले आहे सोबत लोक आहेत म्हणून दुकानदाराने यादीप्रमाणे माल भरायला सुरुवात केली.

त्यावेळी संबंधित भामटा दुकानदाराला म्हणाला की, तुम्ही माझी यादी काढा, माझे कामगार इथे बसून आहेत. तोपर्यंत बाजूला उभ्या केलेल्या कामगारांकडे बोट दाखवत यांना गाडीत बसवून देतो, त्यासाठी मला दहा हजार रुपये द्या, आल्यावर हे दहा हजार आणि बाजाराचे पैसे सगळे देतो असे दुकानदाराला सांगितले.

हेही वाचा: जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ

दुकानदाराला वाटले की बाजाराची मोठी यादी आहे, कामगार इथे बसून आहेत सगळे बिल एकत्र घेता येईल म्हणून संबंधित भामट्याला दहा हजार दिले. त्या भामट्याने ते दहा हजार रुपये घेऊन पोबारा केला. एक तास झाला, बाजार भरून झाला तरी भामटा आला नाही, म्हणून दुकानदाराने दुकानात बसवून ठेवलेल्या कामगारांना तुमचा ठेकेदार कुठे आहे? असे विचारले असता त्या कामगारांनी तो आमचा ठेकेदार नाही, त्यांनी आम्हाला दोनशे रुपये देतो असे सांगून आणले होते असे सांगितले.

दुकानदाराने सर्वत्र भामट्याचा शोध घेतला पण तो काही आढळला नाही. त्यामुळे आता दुकानदाराचा पारा चांगलाच चढला होता. त्याने या बसवून ठेवलेल्या कामगारांचे काहीही एक न ऐकता त्या कामगारांकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. परंतु कामगार नुकतेच गावावरून आले असल्याने त्यांच्याकडे पैसे नव्हते. अखेर ज्या माणसाच्या खोलीत हे कामगार राहायला होते, त्या खोली मालकाने मध्यस्थी करीत त्या फसवणूक झालेल्या कामगारांच्या ठेकेदाराला विनंती केली आणि त्याच्याकडून कामगारांना उचल म्हणून दहा हजार घेतले आणि ते त्या दुकानदाराला देत विषयावर पडदा टाकला.

अशा प्रकारे अनेक घटना या भागात घडत असून पगाराच्या दिवशी कामगारांचे पैसे लुटणे, धमकी देऊन एटीएम कार्ड घेऊन पैसे काढणे, मोबाईल चोरणे अशा अनेक कामगारांना लुटीच्या घटना घडत आहे.

loading image
go to top