राजीव गांधी रुग्णालयात "आउटसोर्स' ; उपचार होणार माफक दरात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

महापालिकेला राजीव गांधी रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालविणे अशक्‍य आहे, त्यामुळे आउटसोर्सचा विचार केला आहे. त्यामुळे ससूनच्या धर्तीवर येथील गरीब व गरजूंना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. 

- अविनाश साळवे, नगरसेवक 

येरवडा : पर्णकुटी चौकातील राजीव गांधी रुग्णालयात हृदयासंदर्भातील रोग निदानासाठी "आउटसोर्स' केले जाणार आहे. त्याचा फायदा परिसरातील गरीब, गरजू रुग्णांना होईल, अशी माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली. 

महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने शनिवारी दुपारी राजीव गांधी रुग्णालयाला भेट दिली. नवजात अर्भक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) विभागाची पाहणी केल्यानंतर डॉ. साबणे यांनी ही माहिती दिली. या वेळी समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक ऍड. अविनाश साळवे, नगरसेविका अश्‍विनी लांडगे, श्‍वेता चव्हाण, किरण जठार, डॅनिअल लांडगे, शंकर चव्हाण, रूपेश घोलप, शैलेंद्र भोसले उपस्थित होते. 

डॉ. साबणे म्हणाल्या, ""द फाउंडेशन व फिनोलेक्‍स कंपनीच्या "सीएसआर'च्या माध्यमातून गांधी रुग्णालयातील नवजात अर्भक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) सुरू केला आहे. शहरात डायलिसिस करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केवळ चारशे रुपयांत डायलिसिस सुविधा येथे लवकरच देणार आहे. संचेती रुग्णालयाचा हाडांच्या संदर्भातील रोगनिदान (ऑर्थो) विभाग गांधी रुग्णालयात सुरू होणार आहे.'' 

डी. वाय. पाटील संस्थेच्या वतीने दंतचिकित्सा विभाग सुरू असून, संस्थेतील डॉक्‍टर बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची तपासणी करतात. रुग्णांच्या छोट्या शस्त्रक्रियासुद्धा करतात. लवकरच राज्य सरकारकडून बॉंड केलेले 130 डॉक्‍टर महापालिकेच्या रुग्णालयांसाठी मिळणार असल्याचे डॉ. साबणे यांनी सांगितले.  

महापालिकेला राजीव गांधी रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालविणे अशक्‍य आहे, त्यामुळे आउटसोर्सचा विचार केला आहे. त्यामुळे ससूनच्या धर्तीवर येथील गरीब व गरजूंना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. 

- अविनाश साळवे, नगरसेवक 

रुग्णालयात सध्या रक्तदाब व मधुमेह असणाऱ्या रुग्णांना वेळेवर गोळ्या, औषधे मिळत नाहीत. गरोदर महिलांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यांना ऐनवेळी प्रसूतीसाठी ससूनला जाण्यास सांगितले जाते. त्यामुळे या सोईसुविधा आधी देणे आवश्‍यक आहे. 

- डॅनिअल लांडगे, अध्यक्ष, आदर्श मित्र मंडळ

Web Title: Outsourced at Rajiv Gandhi Hospital