पिंगोरीच्या डोंगरात रंगला घुबड महोत्सव

किशोर कुदळे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पिंगोरी (ता. पुरंदर) येथील डोंगराच्या कुशीत गेल्या दोन दिवसांत चिमुकले संवगडी हरपून गेले होते. कोणी नाच-गाण्यांमध्ये दंग होते, कोणी भारूड सादर करीत होते, कोणी हाता-तोंडावर घुबडाची चित्रे रंगवून घेत होते, तर कोणी चेहऱ्याला घुबडाचे मुखवटे घालून मिरवत आहेत. निमित्त होते इला फाउंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या दुसऱ्या उलूक महोत्सवाचे. विविध शाळांमधील सुमारे पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

वाल्हे (पुणे) : पिंगोरी (ता. पुरंदर) येथील डोंगराच्या कुशीत गेल्या दोन दिवसांत चिमुकले संवगडी हरपून गेले होते. कोणी नाच-गाण्यांमध्ये दंग होते, कोणी भारूड सादर करीत होते, कोणी हाता-तोंडावर घुबडाची चित्रे रंगवून घेत होते, तर कोणी चेहऱ्याला घुबडाचे मुखवटे घालून मिरवत आहेत. निमित्त होते इला फाउंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या दुसऱ्या उलूक महोत्सवाचे. विविध शाळांमधील सुमारे पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या महोत्सवामध्ये पुरंदर तालुक्‍यातील विविध शाळांमधील चिमुकले सामील झाले होते. त्यांच्याबरोबर तब्बल सतरा देशांतील संशोधकदेखील सहभागी झाले होते, अशी माहिती इला फाउंडेशनचे संस्थापक व पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले. अंधश्रद्धा व गैरसमजातून घुबड पक्षाला अशुभ मानले गेले आहे. हा पक्षी पिकांतील उंदीर आणि घुशींचा नायनाट करत असल्याने तो खऱ्याअर्थी शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी व अंधश्रद्धेच्या फेऱ्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून इला फाउंडेशन प्रयत्नशील आहे.

या वर्षीच्या महोत्सवासाठी अमेरिका, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, नॉर्वे, इराण, नेपाळ, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पोलंड, झेक प्रजासत्ताक आदी सतरा देशांतील संशोधक सहभागी झाले होते. डॉ. सुरुची पांडे, अमेरिकेचे स्टीव शेफील्ड, दक्षिण आफ्रिकेचे जोनाथन हो, कॅनडाच्या केरण विब, नॉर्वेचे थॉमस आरावाक, ऑस्ट्रेलियाचे इंग्रीड बार्बरा कोल यांनी मार्गदर्शन केले.

परदेशी पर्यटकांना महोत्सवाची भुरळ
पिंगोरी येथील इला हॅबीटेट या पक्षी संशोधन केंद्रामध्ये दुसऱ्यांदा उलूक महोत्सवाचे आयोजन झाले आहे. यामध्ये घुबडांची चित्रे रेखाकृती, भेटकार्ड, कागदी मुखवटे, मातीची व इतर शिल्पे, पोस्टर ओरिगामी, कथा-कविता, मेंदी व रंगावली यांचे आयोजन करण्यात आले होते. नामांकित छायाचित्रकारांच्या घुबडांवरील छायाचित्रांचे प्रदर्शनही साकारण्यात आले होते. त्याबरोबरच घुबडांवरील माहितीपट, कार्टून, लघुचित्रपट यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भारूड, प्रवचनाने परदेशी पर्यटकांना भुरळ घातली, असे राजकुमार पवार व राहुल लोणकर यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Owl Festival at Pingori In Purandar Tehesil