esakal | सिंगापूरची साधने कोरोना रुग्णांना देणार श्वास

बोलून बातमी शोधा

 ऑक्सिजन
सिंगापूरची साधने कोरोना रुग्णांना देणार श्वास
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सिंगापूरमधून चार हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, 250 व्हेंटिलेटर अल्पावधीत पुण्यात पोचणार आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात त्यांचे मोफत वाटप होणार आहे. हे करणार आहे ते कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिक म्हणून आपणही पुढाकार घेतला पाहिजे, या जाणिवेतून काम करणाऱ्या पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (पीपीसीआर) ही संघटना. त्यासाठी त्यांनी मिशन वायू ही मोहीम हाती घेतली असून समाजातील अन्य घटकांनीही आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन पीपीसीआरने केले आहे.

घटनाक्रम

1- कोरोनाचा हाहाकार - वाढती रुग्णसंख्या, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा तुटवडा

2- पीपीसीआरने परदेशात साधला संपर्क - सिंगापूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेकडे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आणि बायपॅप्स व्हेंटिलेटर आहेत, असे 10 दिवसांपूर्वी समजले.

3- गरजेनुसार पुरवठा होऊ शकतो, याची पीपीसीआरने खात्री केली

4- चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. किंमत ठरली. जुळवाजुळव सुरू झाली.

5- केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी प्रयत्न, पीएमओ कार्यालय, केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांच्याशी संपर्क

6- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्य सरकारचे सहकार्य

7- केंद्र सरकारने सुमारे 3 कोटी रुपयांचे आयात शुल्क माफ केले

8- एअर इंडियाची वाहतुकीसाठी मदत

9- वितरणासाठी अॅमेझॉन इंडियाची मदत

10- पुढील पाच दिवसांत हे सर्व साहित्य भारतात पोचणार

  • असे होणार वाटप

    उपचारांची सुविधा ग्रामीण भागातच झाली तर तेथील रुग्ण शहरांत येणार नाहीत. त्यामुळे 50 टक्के साधने ग्रामीण भागात तर 50 टक्के साधने शहरी भागात मोफत वितरीत होणार आहेत. त्यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागांना प्राधान्य दिले जाणार आहे.

  • साधने केव्हा पोचणार

    250 व्हेंटिलटर रविवारपर्यंत मुंबईत पोचतील तर, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर तीन-चार दिवसांत येतील. सर्व आयात 5 दिवसांत पूर्ण होईल. या साधनांच्या माध्यमातून किमान 20 हजार रुग्णांवर एकाच वेळी उपचार होतील. पुढेही त्याचा सातत्याने वापर करता येईल.

कोरोनाचे संकट भीषण आहे, अशा वेळी ज्यांच्या शब्दात ताकद आहे, अशा घटकांनी समाजासाठी काम केलं पाहिजे. त्यामुळे सुधीर मेहता यांनी सहकार्य मागितल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी वैद्यकीय उपकरणे आयातीसाठी ड्यूटी तीन महिन्यासाठी फ्री करण्याचा निर्णय तातडीने केला. यापुढील काळातही समाजाला गरज लागेल तिथे भाजपचा सहकार्याचा हात तत्परतेने पुढे असेल.

- चंद्रकांत पाटील (प्रदेशाध्यक्ष, भाजप)

ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज सध्या खूप आहे. ग्रामीण भाग, शहरी भागात त्याचे वितरण तातडीने होणे गरजेचे आहे. समाजाच्या सहकार्याने पीपीसीआर काम करीत आहे. त्यातून रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. एकत्रित समाजाची ताकद दाखविण्याची ही वेळ आहे. आपण त्यासाठी कर्तव्य म्हणून काम केले पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.

- सुधीर मेहता (अध्यक्ष - एमसीसीआयए, मुख्य समन्वयक - पीपीसीआर)

ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, बायपॅप्स व्हेंटिलेटर ही उपकरणे रुग्ण घरच्या घरी वापरू शकतात. तत्पूर्वी डॉक्टर त्यांना त्याचा वापर करण्याचे प्रशिक्षण देतात. जगभर त्याचा वापर रुग्ण घरी करतात.दोन्हीही उपकरणे हॅन्डी आहेत. त्यामुळे रुग्णांना त्याचा वापर सहजपणे करता येईल.

- डॉ. बी. डी. बांडे (एमडी, आयसीयु प्रमुख, नोबल हॉस्पिटल) -

मिशन वायू हा उपक्रम काय आहे

कोरोनामुळे निर्माण झालेला आॅक्सीजन आणि व्हेंटीलेटरचा तुटवडा कमी करण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅंड अॅग्रीकल्चरने (एमसीसीआयए) पुढाकार घेत पीपीसीआरची स्थापना केली आहे. उद्योग- व्यवसाय, आरोग्य क्षेत्रातील अनेकजण या प्लॅटफॉर्मचे सदस्य आहेत. या माध्यमातून ‘मिशन वायू’या उपक्रमातंर्गत शहरी तसेच ग्रामीण विशेषतः दुर्गम भागातील रुग्णांलये कोरोनाशी सामना करण्यासाठी सक्षम करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी चार हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, 250 व्हेंटिलेटर तेथेवर पोचविण्यात येतील.

अशी झाली या उपक्रमाची सुरवात

देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर कोठे उपलब्ध होतील, याचा पीपीसीआर शोध घेत आहे. त्यासाठी त्यांनी परदेशातही संपर्क साधला. सिंगापूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेकडे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आणि बायपॅक व्हेंटिलेटर आहेत, असे 10 दिवसांपूर्वी समजले. आपल्या गरजेनुसार त्यांचा पुरवठा होऊ शकतो, याची पीपीसीआरने खात्री केली. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. किंमत ठरली. विमानाच्या पाच - सहा फेऱयांतून हे साहित्य पुणे- मुंबईत येऊ शकते, असे लक्षात आल्यावर पुढची जुळवाजुळव सुरू झाली.

लागले अनेकांचे हातभार

परदेशातून कोणतीही गोष्ट आणायची असेल तर, त्याला केंद्र सरकारची मंजुरी लागते. आयातीवर शुल्कही (इंपोर्ट ड्यूटी) जास्त असते. त्यासाठी पीपीसीआरने पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्री पियूष गोयल यांच्याकडे संपर्क साधला. उद्देश स्पष्ट झाल्यावर त्यांनीही सहकार्य केले. त्यातून आयात शुल्क माफ केल्यामुळे पीपीसीआरचे सुमारे 3 कोटी रुपये वाचले. एअर इंडियाने वाहतुकीसाठी मदत करण्याची तयारी दाखविली तर, भारतात त्याचे वितरण करण्यासाठी अॅमेझॉन इंडियाने मदत केली. या सगळ्या प्रक्रियेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्य सरकारनेही पीपीसीआरला सहकार्य केले.

निधीचे आव्हानही पेलले

सिंगापूरहून ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, बॅकपॅक व्हेंटिलेटर आणण्यासाठी 30 कोटी रुपये खर्च येणार आहे. भारतात त्याचे वितरण मोफत करण्याचे पीपीसीआरने ठरविले आहे. त्यासाठी उद्योग, व्यावसायिक, रुग्णालये, लायन्स, रोटरी क्लब, शैक्षणिक संस्था, रुग्णालये यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही काही दिला. मराठा चेंबरनेही त्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे पीपीसीआरला हुरूप आला, आपण आयात करू शकतो, असा आत्मविश्वास आला. निधी संकलननानेही वेग घेतला आहे. त्यातून काही प्रमाणात निधी जमा झाला आहे तर उर्वरित निधीसाठी समाजाला आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील बँक खात्यात मदत जमा करता येणार येर्इल :

Account Name: Mahratta Chamber of Commerce Industries and Agriculture

Banks Name: AXIS BANK LTD, Savings Account

Account Number: 315010100016515

IFS Code: UTI80000315

MICR Code: 411211009

Banks address: SENAPATI BAPAT ROAD, PUNE

PAN Number: AAATM5559Q

GSTIN: 27AAATM5559Q1ZS

अधिक माहितीसाठी csr@mcciapune.com या मेलवर किंवा 98505 86619 या मोबाईलवर संपर्क साधावा.