esakal | ऑक्सिजनचा पुरवठा अद्याप विस्कळित

बोलून बातमी शोधा

oxygen
ऑक्सिजनचा पुरवठा अद्याप विस्कळित
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील ऑक्सिजनचा पुरवठा अद्यापही सुरळीत होऊ शकलेला नाही. तुटवड्यामुळे गुरुवारी ऑक्सिजन बेडची संख्या कमी करण्याची वेळ महापालिकेवर आली. तसेच नवीन रुग्णांना दाखल करून घेणे बंद करण्यात आले. शहरातील स्वयंसेवी संस्थांनी उभारलेली रुग्णालये ऑक्सिजन पुरवठ्याअभावी सुरू होऊ शकत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची चहूबाजूने कोंडी होऊ लागली आहे.

महापालिकेने कोरोनाबाधितांसाठी स्वत:च्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा फटका पुणे शहरालाही मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांना दररोज ४२ टन ऑक्सिजनची गरज भासते. परंतु गेल्या काही दिवसांपासून जेमतेम ३५ टन पुरवठा होत आहे. गुरुवारी तेवढाही पुरवठा होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत ऑक्सिजनसाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते.

हेही वाचा: पुण्यात कुठे मुसळधार, कुठे गारपीट; खडकवासला ते टेमघर किती झाला पाऊस?

ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे महापालिकेने ऑक्सिजन बेड कमी करण्यास सुरवात केली आहे. दळवी, लायगुडे, डॉ. नायडू, ईएसआय आणि जम्बो रूग्णालयातील ऑक्सिजन बेडची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच नव्याने रूग्ण दाखल करून घेण्यास नकार दिला जात आहे. खासगी रुग्णालयांची देखील काही वेगळी परिस्थिती नसल्याचे समोर आले आहे. शहरात काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकर घेत ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले रूग्णालय उभारले आहेत. केवळ ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्यामुळे ते सुरू करता येत नाहीत. त्यामुळे बेड‌स आहेत, परंतु ऑक्सिजन नाही, यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

''पुणे शहराला दररोज ४२ टनाहून अधिक ऑक्सिजनची गरज लागते. परंतु सध्या जेमतेम ३५ टनच ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. तुटवड्यामुळे महापालिकेच्या रूग्णालयातील ऑक्सिजन बेडची संख्या कमी करण्याची वेळ आली आहे.''

- श्रीनिवास कंदुल, विद्युत विभागप्रमुख, पुणे महापालिका