'पुलं' म्हणजे निखळ आनंद : शि. द. फडणीस 

'पुलं' म्हणजे निखळ आनंद : शि. द. फडणीस 

पुणे : "छोट्या-छोट्या गोष्टींतून विनोदनिर्मिती करत आनंद देण्यात पु. ल. देशपांडे यांचा हातखंडा होता. अफाट कल्पकता, प्रसंगावधान, विनोदबुद्धी, सगळ्या कलांविषयीची आस्था, मिस्कीलपणा आणि सदैव हसरे व्यक्तिमत्त्व असणारे "पुलं' म्हणजे निखळ आनंदाच्या वाटा जोडणारा पूल आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी "पुलं'बद्दल गौरवोद्गार काढले. 

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष उद्यापासून (गुरुवार, ता. 8) सुरू होत आहे. यानिमित्ताने साहित्यवेध प्रतिष्ठान आणि संवाद संस्थेने आयोजित केलेल्या व्यंग्यचित्र आणि दुर्मीळ फोटो प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी फडणीस बोलत होते. शि. द. फडणीस आणि लेखक श्रीपाल सबनीस यांनी या वेळी पुलंच्या अनेक आठवणी सांगितल्या. व्यंग्यचित्रे, पुलंचे दुर्मीळ फोटो यांच्या प्रदर्शनातून पुलंचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न साहित्यवेध प्रतिष्ठानने केला आहे. 

कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, शांता शेळके, ना. धों. महानोर या साहित्यिकांसोबतच्या पुलंच्या दुर्मीळ फोटोंची मांडणी या प्रदर्शनात केलेली आहे. गायन, वादन करणारे पुलं, भाषण करणारे, नाटकात अभिनय करणारे पुलं, पत्नी सुनीताबाईंसोबतचे काही खास क्षणही या फोटोप्रदर्शनातून पाहता येणार आहेत. ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस, वसंत सरवटे व आलोक निरंतर, संजय मिस्त्री या व्यंग्यचित्रकांरानी पुलंच्या आयुष्यावर तसेच अंतू बर्वा, नारायण, सखाराम गटणे या पुलंच्या गाजलेल्या व्यक्तिरेखांवर काढलेली व्यंग्यचित्रे हे या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य. यासोबतच पुलंच्या लेखनातील गाजलेली वाक्‍यं, विनोद यांचीही व्यंग्यचित्रात्मक मांडणी ही साहित्य - कलाप्रेमींसाठी मेजवानी ठरणार आहे. 

1994 पासून मला पुलंचा सहवास लाभला. कला - साहित्याच्या क्षेत्रात खूप मोठे काम पुलंनी करून ठेवले आहे. पुलंच्या समग्र व्यक्तिमत्त्वाची, जीवनाची फोटो - चित्ररूपाने नव्या पिढीला ओळख व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन भरवले आहे. पुलंच्या जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्रभर हे प्रदर्शन घेऊन जाण्याचा माझा मानस आहे. 
- कैलास भिंगारे, आयोजक, साहित्यवेध प्रतिष्ठान 

नागरिकांसाठी उद्यापर्यंत खुले 
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेले हे प्रदर्शन 9 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळात सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com