पु. ना. गाडगीळ पेढी द्विशतकाच्या उंबरठ्यावर

सांगलीहून सुरू झालेला प्रवास कर्नाटकापर्यंत विस्तारला
png
pngsakal

पुणे : गणेश नारायण गाडगीळ यांनी २९ नोव्हेंबर १८३२ रोजी सांगलीतील सराफ कट्टा येथे स्थापन केलेली ही पेढी द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोचली आहे. सांगलीपासून सुरू झालेला हा प्रवास अवघा महाराष्ट्र-कर्नाटकापर्यंत विस्तारत आहे.

पीएनजीच्या मूळ दुकानाची मुहूर्तमेढ सांगली येथे रोवण्यात आली. सध्या या फर्मच्या सराफ कट्टा-सांगली, विश्रामबाग-सांगली, कोल्हापूर, कराड, इचलकरंजी, रत्नागिरी, चिपळूण, तसेच कर्नाटकात बेळगावी, विजयपूर व जमखंडी येथे शाखा कार्यरत आहेत. कित्येक पिढ्यांच्या कष्ट आणि चिकाटीतून हा विस्तार झाला आहे. शंकर गणेश ऊर्फ अप्पासाहेब गाडगीळ, हरी वासुदेव गाडगीळ, यशवंत शंकर ऊर्फ बाबूराव गाडगीळ असे संचालक होते.

अप्पासाहेबांचे चिरंजीव प्रभाकर शंकर ऊर्फ अरुण गाडगीळ, प्रकाश शंकर गाडगीळ व हरिभाऊंचे चिरंजीव आमदार धनंजय ऊर्फ सुधीर हरी गाडगीळ, गणेश हरी गाडगीळ, बाबूराव गाडगीळ यांचे चिरंजीव पुरुषोत्तम यशवंत ऊर्फ मिलिंद गाडगीळ यांनी मिळून भागीदारी बनली. त्यानंतर प्रभाकर शंकर यांचे चिरंजीव राजीव प्रभाकर गाडगीळ, समीर प्रभाकर गाडगीळ आणि धनंजय हरी यांचे सुपुत्र वासुदेव धनंजय ऊर्फ सिद्धार्थ गाडगीळ हे संचालक झाले. सध्या पीएनजीची सातवी पिढी म्हणजे राजीव प्रभाकर यांचे चिरंजीव तेजस व तन्मय गाडगीळ हे देखील कार्यरत आहेत.

पुण्यात १९५८ मध्ये लक्ष्मी रस्त्यावर कुंटे चौकात पु. ना. गाडगीळ आणि कंपनी या नावाने फर्म सुरू झाली. त्यामध्ये लक्ष्मण वासुदेव ऊर्फ लखुनाना गाडगीळ, अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ व विश्वनाथ वासुदेव ऊर्फ विसुभाऊ गाडगीळ असे संचालक होते. कालांतराने ऐंशीच्या दशकात या फर्ममधील एक संचालक श्रीकृष्ण लक्ष्मण ऊर्फ राजाभाऊ गाडगीळ यांनी पीएनजी ज्वेलरी अ‍ॅण्ड जेम्स, २०१२ मध्ये अजित गाडगीळ यांनी पु. ना. गाडगीळ आणि सन्स, तसेच पराग यशवंत गाडगीळ यांनी पीएनजी ज्वेलर्स या नावाने फर्म स्थापन केली. पु. ना. गाडगीळ आणि सन्स या फर्ममध्ये अजित गाडगीळ यांच्याबरोबर अभय सदाशिव गाडगीळ हे संचालक म्हणून होते. कालांतराने २०१६ मध्ये अभय गाडगीळ यांनी पु. ना. गाडगीळ १८३२ ही नवी फर्म सुरू केली.

आजही सारी भावंडे नातेसंबंध जपत नेकीने स्वतंत्रपणे व्यवहार सांभाळत आहेत. प्रामाणिकपणा, अस्सलता आणि ग्राहकांचा विश्वास हा समान धागा आहे. नेमकी डिझाईन, दागिन्यांमध्ये दडलेली पारंपारिकता आणि रोज येणारे ट्रेण्ड्स याचे भान सांभाळत पेढीने लौकिक सतत वृद्धींगत केला आहे. या पेढीने सुवर्णाबरोबरच हिरे, माणिक यांच्यातही वैविध्य जपले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com