ग्रामीण भागातच रोजगाराच्या संधी

ग्रामीण भागातच रोजगाराच्या संधी
ग्रामीण भागातच रोजगाराच्या संधी

विज्ञान आश्रममधून 3 हजार जण उद्योजक म्हणून विकसित

शिक्रापूर (पुणे): दिवंगत ज्येष्ठ शास्त्रज्ञ व विज्ञान आश्रमचे संस्थापक डॉ. एस. एस. कलबाग यांनी शालेय अभ्यासक्रमात रस नसलेल्यांसाठी विकसित केलेल्या ग्रामीण तंत्रज्ञान पदविका या अभ्यासक्रमाला नुकतीच 35 वर्षे पूर्ण झाली. या 35 वर्षांत केवळ शिरूर तालुकाच नव्हे, तर देशातील चार राज्यांतील मिळून जवळपास 3000 जण उद्योजक म्हणून विकसित झाले आहेत. गुरुकुल शिक्षण पद्धतीला अनुसरून सुरू झालेला हा अभ्यासक्रम आता चार राज्यात सुरू झाल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी दिली.

शालेय शिक्षणावरच कुणाची क्षमता व रोजगार पात्रता ठरू नये आणि शाळेत रस नसला तरी आयुष्यात यशस्वी होता येते. तसेच ग्रामीण युवकांना त्यांच्यातील कौशल्यावरच गाव-परिसरात रोजगार प्राप्त करता येतो. हेच दाखवून देण्यासाठी 39 वर्षांपूर्वी अमेरिकेतील हिंदुस्थान लिव्हर कंपनीतील ज्येष्ठ संशोधकाची नोकरी सोडून पाबळ (ता. शिरूर) येथे दाखल झालेले डॉ. एस. एस. कलबाग यांनी अथक परिश्रमाने ग्रामीण तंत्रज्ञान पदविका हा अभ्यासक्रम सुरू केला होता. पोल्ट्री, कृषी-सिंचन, खतनिर्मिती, ट्रॅक्‍टर चालविणे व दुरुस्ती, सौरऊर्जा, इन्व्हर्टर तंत्रज्ञ, खाद्यपदार्थ निर्मिती, संगणक तंत्रज्ञान, संगणकीय हिशेब तपासणी, वेल्डिंग, शेती, नर्सरी, कोंबडी-शेळीपालन, सुतारकाम आदींसह ग्रामीण भागातील कामाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण या एक वर्षाच्या निवासी प्रशिक्षणात समाविष्ट केलेले आहे.

दरवर्षी जुलैपासून सुरू होत असलेल्या या अभ्यासक्रमासाठी सुरवातीला 20 विद्यार्थ्यांची निवासी बॅच सुरू करण्यात आली होती. मात्र वाढत्या मागणीनुसार व उपलब्ध निवासाच्या जागेनुसार आता ही बॅच 60 जणांची केली आहे. या अभ्यासक्रमाला राष्ट्रीय मुक्त शिक्षा संस्थेची परवानगी असून, पदविका प्राप्त केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी उद्योजक म्हणून उभा राहीपर्यंत संस्थेकडून पाठबळ दिले जाते. दरम्यान, या कोर्ससाठी मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा आदी भागांतूनही विद्यार्थी येत आहेत.

1) स्वतःच्या पायांवर उभे राहायचे..
या कोर्ससाठीची पात्रता एकच ती म्हणजे तुम्हाला स्वतःच्या पायांवर उभे राहायचे आहे. त्यासाठी केवळ संवाद व प्रशिक्षण समजण्यासाठी आठवी पास कुणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकणार असून, येथे वयाचेही बंधन नाही. त्यामुळे आयुष्याच्या कुठल्याही वयात स्वतःला सिद्ध करण्याचा अजब कोर्स म्हणून याकडे पाहावे, असे येथील संचालक रणजित शानबाग आवर्जून सांगतात.

2) मुलींना पूर्ण मोफत
येथे केवळ राहणे आणि जेवणाचा खर्च एवढाच काय तो खर्च संस्था विद्यार्थ्यांकडून आकारते. त्यातही आदिवासी विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी 50 टक्के सवलत एका संस्थेने जाहीर केलेली आहे. या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनी वा युवतींना राहणे, खाणे व प्रशिक्षण संपूर्ण मोफत असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.

3) रंग-देची अशीही कर्जयोजना..
गरजवंत नवउद्योजकांना कर्ज स्वरूपात मदत करायची आणि ती वार्षिक दोन टक्के दराने उद्योजकांनी परत करायची अशी योजना या कोर्ससाठी लिंक करण्यात आलेली आहे. अशी मदत देणारे संपूर्ण देशातील काही उच्चशिक्षित उद्योजक व विचारवंत असून, त्यांनी स्थापन केलेल्या रंग-दे संस्थेद्वारे विज्ञान आश्रमामधील 10 ते 12 प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख एवढे दिले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com