प्लॅस्टिकबंदीमुळे  पॅकेजिंग व्यवसाय ठप्प

सुवर्णा येनपुरे-कामठे
मंगळवार, 26 जून 2018

पुणे - संपूर्ण राज्यात प्लॅस्टिकबंदीचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात आले असले, तरी याला पर्याय अद्यापही उपलब्ध करून दिलेला नाही. यामुळे पॅकेजिंग उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम असल्याचे पाहायला मिळते. 

पुणे - संपूर्ण राज्यात प्लॅस्टिकबंदीचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात आले असले, तरी याला पर्याय अद्यापही उपलब्ध करून दिलेला नाही. यामुळे पॅकेजिंग उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम असल्याचे पाहायला मिळते. 

पॅकेजिंग करणारे बहुतांश लघुउद्योग असल्याने त्यांच्यावर प्लॅस्टिकबंदीचा थेट परिणाम झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य असणाऱ्या या बंदीचे लघुउद्योजक स्वागत करीत असले, तरी याच्या पर्यायांबाबत त्यांच्यापुढे संभ्रम आहे. प्लॅस्टिकच्या जागी मोठ्या प्रमाणात पुठ्ठ्याच्या पेपरचा पॅकिंगसाठी वापर होत आहे. परंतु, त्याला काही ठिकाणी मर्यादा येत आहेत. त्यामुळे या लघुउद्योजकांच्या व्यवसायवृद्धीवर मर्यादा येत आहेत. 

हवाबंद पॅकिंगवर पर्याय उपलब्ध नसल्याने अन्नपदार्थ पॅकिंग करणारे बचत गट, लघुउद्योजक यांच्यावर परिणाम झाल्याचेही पाहायला मिळत आहे. बिस्कीट, वेफर्स आदींसाठी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. परंतु, यामुळे उत्पादनाच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशावर याचा भार येणार आहे. 

फराळ, स्नॅक्‍स, चटण्या, मसाले हे पदार्थ हवाबंद, तसेच पारदर्शक पद्धतीने पॅक केले जावेत, अशी अट खाद्य परवाना विभागाने बचत गटांना घातली आहे. परंतु, प्लॅस्टिकबंदीमुळे ही अट नेमकी कशी पाळायची अशी अडचण बचत गट चालविणाऱ्या सर्वसामान्य महिलांसमोर  आहे. हा पर्याय लवकर उपलब्ध न झाल्यास त्यांचा रोजगारही जाण्याची शक्‍यता आहे. या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्‍नदेखील इथे उपस्थित होतो.  

पॅकेजिंगचा व्यवसाय हा संपूर्णतः प्लॅस्टिकवर अवलंबून असतो. यासाठी सध्या पर्याय म्हणून आम्ही पुठ्ठ्याचा कागद वापरतो. पण बबल प्लॅस्टिक पेपरला पर्याय नाही. तसेच पुठ्ठ्याच्या कागदाचे पॅकिंग पावसात खराब होण्याची शक्‍यता असते. हे पॅकिंग फार काळ टिकू शकत नाही. कागदाचा पुनर्वापर करून पुठ्ठ्याच्या कागदाची निर्मिती करण्यात येते. परंतु मागणी वाढल्यामुळे याचा परिणाम पुन्हा एकदा निसर्गावर व पर्यायाने झाडांवर होणार आहे. 
- शंकर बिरादार,  भाग्यलक्ष्मी पॅकर्स ॲण्ड मूव्हर्स

सरसकट बंदी असल्याचे अधिकारी सांगत आहेत. प्लॅस्टिकची तपासणी करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही मशिन उपलब्ध नाही. प्लॅस्टिक जप्त करून अनेक लघुउद्योजकांवर सरसकट कारवाई करण्यात आली. लघुउद्योजकांची दंड भरण्याची क्षमता नसल्याने त्यांनी उत्पादनच थांबविले आहे. प्लॅस्टिकला पर्यायी वेष्टनामुळे उत्पादनाच्या किमती वाढत आहेत, हे लघुउद्योजकांना परवडणारे नाही. 
- सचिन निवंगुणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा किरकोळ व्यापारी संघ 

खाद्यपदार्थांचा परवाना देतानाच ते पारदर्शक आणि फार काळ टिकतील अशा हवाबंद पद्धतीने पॅक करण्यात यावेत अशी अट आम्हाला घातली होती. परंतु, प्लॅस्टिकबंदी व कारवाईमुळे बचत गटातील महिलांनी धास्ती घेतली आहे. त्या रोजचे पदार्थ बनवून पॅक करून विकतात. अशाने त्यांचा रोजगारच थांबू शकतो. अनेकांनी या रोजगारावर कर्जदेखील घेतले आहे. 
- संगीता पाटणे, पूर्वा फूड 

प्लॅस्टिकबंदी होणार असल्याचे सरकारने आधीच सांगितले होते, त्यामुळे ग्राहकांनीदेखील याचे स्वागत करून बटर पेपर, पुठ्ठ्याचा कागद वापरण्यास सुरवात केली आहे. 
- प्रशांत तांबे,  प्रशांत पॅकेजिंग

Web Title: Packaging business jam due to plasticbans