Video : आंदर मावळात भाताची पिके पाण्याखाली: शेतकऱ्यांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

- आंदर मावळात मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. 
-ओढया नाल्यांना पूर आला आहे. लहान मोठ्या बंधाऱ्या वरून पाणी ओलांडून वाहत असून जोराच्या पावसाने बांध फुटले आहे.
- मोठे मोठे नाले पडले असून लावलेले भात पिक वाहून गेले आहे. 

टाकवे बुद्रुक : आंदर मावळात मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे, ओढया नाल्यांना पूर आला आहे. लहान मोठ्या बंधाऱ्या वरून पाणी ओलांडून वाहत असून जोराच्या पावसाने बांध फुटले आहे. मोठे मोठे नाले पडले असून लावलेले भात पिक वाहून गेले आहे. मातीच्या थरात भात गाडून गेले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सर्वाधिक फटका आंदर मावळातील कशाळच्या रामदास जोरी आणि तुकाराम जाधव या शेतकऱ्यांना बसला आहे, त्या पाठोपाठ महादू निखोटे, जयराम निखोटे, पंढरीनाथ सुतार, गबळू जाधव, अनिल जाधव यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गावाच्या पश्चिम बाजूला कामथाचा माळ परिसरात या सर्वाची शेती ओढ्याच्या उतारावर आहे. याच ओढयावर बंधारा बांधलेला आहे. 

तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने बंधारा ओसंडून वाहतो आहे. ओढायला पूर आला. या पूरात शेतकऱ्यांचे बांध फुटले असून नाले पडले आहेत. पाण्याचा प्रवाह इतका जोराचा आहे की त्यात काही झाडे उन्मळून पडलीय. ओढ्याच्या पलिकडे गवणे वस्ती आहे, येथील दहा ते बारा विद्यार्थी शाळेत आले होते त्यांना माघारी जाता न आल्याने त्यांनी नातेवाईकांकडे मुक्काम केला. 

भात पिकाचे किती नुकसान झाले हे पाणी ओसरल्यावर समजले सध्या तरी सगळेच भात रोपे पाण्यात गाडून गेली आहे. ही परिस्थिती फक्त कशाळ गावावर आहे असे नाही तर पावसाचे आगार ओळखले जाणाऱ्या आंदर मावळच्या संपूर्ण पश्चिम भागात आहे.

शासनाने आता या नुकसानीचे पंचनामे करावेत तसेच पीक विमा काढणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती डोळ्यायांनी पाहावी. कारण पूर ओसरला की, शेतकऱ्यांना मदत देताना शासन व पीक विमा कंपनीवाले हात आखडता घेत आहे. याचा शेतकऱ्यांना या पूर्वीचा अनुभव आहे. पावसाने उडालेल्या हाहाकारात शेतकऱ्यांचे नुकसान होते याकडे शासनाने लक्ष द्यावे या मागणीने जोर धरला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paddy crops destroyed in heavy rain at andar maval