महाविकास आघाडीला एकीचे, तर भाजपला पाच वर्षांतील कारभाराचे फळ

महाविकास आघाडीला एकीचे, तर भाजपला पाच वर्षांतील कारभाराचे फळ

पुणे : शिस्तबद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केलेली नोंदणी आणि प्रत्यक्षात मतदान करून घेतल्यामुळेच पुणे पदवीधर मतदार संघात विजय खेचून आणणे शक्‍य झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पदवीधरांच्या मदतीने भाजप आणि या दोन्ही नेत्यांना सणसणीत चपराक दिली. 

दरवर्षापेक्षा यंदा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीला वेगळे महत्त्व होते. राज्यात सत्तेवर आल्यानंतर पहिल्यादांच तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उडी घेतली. तर महाविकास आघाडीला या निवडणुकीच्या माध्यमातून धक्का देण्याची तयारी भाजपने केली होती. परंतु नव्याने मतदारांची नोंदणी, मतदानाची वाढलेली टक्केवारी, रिंगणातील उमेदवारांच्या संख्येपासून ते मते बाद होण्याचे कमी झालेले प्रमाण आणि 62 उमेदवार असून देखील मतदारांनी पसंतीक्रमाची मते देताना दाखविलेला सामंजस्यपणा अशा अनेक गोष्टीमुळे ही निवडणूक वैशिष्टपूर्ण ठरली. 

1960 मध्ये हा मतदार संघ अस्तित्वात आला. तेव्हापासूनच इतिहास पाहिला तर पहिल्या दोन निवडणुका वगळता हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला राहिला. या आधी कॉंग्रेसकडून या मतदार संघाकडे कायमच दुर्लक्ष झाले. त्यानंतर आलेल्या राष्ट्रवादाला नेहमीच बंडखोरीच्या फटका सहन करावा लागला. त्याचा फायदा भाजपला होत गेला. यंदाची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली. महाविकास आघाडीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्यासह शिवसेनेची नेते मंडळी एकीकडे, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि माजी मंत्री, भाजपचे राज्यातील दोन नंबरचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दुसरीकडे अशी ही लढत होती. नियोबद्ध मतदार नोंदणी, बंडखोरी रोखण्यातील आलेले यश आणि उमेदवार अरुण लाड यांची यंत्रणा असा तिहेरी संगमामुळे हे शक्‍य झाले. 

पुढील वर्षभरात ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणावर होत आहे. या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निवडणुकीकडे पाहिले. त्यातून तिन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केले, तर काय होऊ शकते हे या निमित्ताने महाविकास आघाडीने दाखवून दिले. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना आणि संस्थाचालकांना ज्या पद्धतीने वागणूक दिली. त्याचाही परिणाम या निवडणुकीवर दिसून आला. त्यातून भाजपला पराभवाचा दणका बसला. या पराभवातून धडा घेऊन भाजपचे नेते कारभारात सुधारणा करतील, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com