‘पेड’ कार्यकर्त्यांची चलती!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत काही उमेदवारांचे हक्काचे कार्यकर्ते गायब झाले आहेत. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी रोजंदारीवरील कार्यकर्त्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. ‘इव्हेंट एजन्सी’कडून पुरविण्यात येणाऱ्या या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी दिवसाला ८०० ते १२०० रुपये दिले जात आहेत.

पुणे - महापालिका निवडणुकीत काही उमेदवारांचे हक्काचे कार्यकर्ते गायब झाले आहेत. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी रोजंदारीवरील कार्यकर्त्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. ‘इव्हेंट एजन्सी’कडून पुरविण्यात येणाऱ्या या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी दिवसाला ८०० ते १२०० रुपये दिले जात आहेत.

गेल्या पाच वर्षांत बदललेल्या राजकारणामुळे अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्यांपासून दुरावले आहेत. त्यामुळेच आता राजकारणाचा ‘ट्रेंड’ बदलताना दिसत आहे. काही उमेदवारांचे हक्काचे कार्यकर्ते ऐन निवडणुकीत गायब झाल्याने त्यांच्या प्रचाराचा डोलारा ‘इव्हेंट कंपनी’द्वारे पुरविण्यात येणाऱ्या रोजंदारीवरील कार्यकर्त्यांवर येऊन पोचला आहे. महाविद्यालयीन तरुण हे काम करत आहेत. यामुळे त्यांना तात्पुरता रोजगारही उपलब्ध झाला आहे. 

उमेदवार एजन्सीकडून दिवसाला किमान ५० ते १०० रोजंदारीवरील कार्यकर्त्यांची मागणी करत आहेत. घरोघरी जाऊन पत्रक वाटणे, सोशल मीडिया हाताळणे, रॅलीत घोषणा देणे, निवडणूक कचेरीत बसणे, येणाऱ्या लोकांची बडदास्त ठेवणे, अशी विविध कामे ते करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अपक्ष उमेदवारांसह प्रमुख राजकीय पक्षांकडूनही त्यांना मागणी असून, २० फेब्रुवारीपर्यंत या कार्यकर्त्यांचे ‘बुकिंग’ करण्यात आले आहे. 

आज एका पक्षात; उद्या दुसऱ्या पक्षात
शक्तिप्रदर्शन करण्यासाठी अनेक उमेदवार दुचाकी रॅली काढताना दिसून येतील. या रॅलींमध्ये दुचाकी पुरेशा नसतात. अशा वेळी उमेदवार ‘इव्हेंट एजन्सी’चा आधार घेत असून, त्यासाठी कार्यकर्त्यांची मागणी करत आहेत. एका दुचाकीसाठी पेट्रोल, एक वेळचे जेवण व साधारण १५०० रुपये भत्ता देऊन रॅलीसाठी कार्यकर्ते पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे हे कार्यकर्ते आज एका पक्षाच्या प्रचारात, तर उद्या दुसऱ्या पक्षाच्या प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत.

उमेदवारांकडून रोजंदारीवरील कार्यकर्त्यांची मागणी वाढली आहे. प्रचारासाठी त्यांचे २० फेब्रुवारीपर्यंत ‘बुकिंग’ करण्यात आले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून त्यांना मागणी आहे.     
- रसिक भगत, व्यावसायिक

Web Title: paid activities