काळ्या पैशांतून सोने खरेदीवर 'प्राप्तिकर'ची नजर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

पिंपरी - रोख रकमेत दडवून ठेवलेल्या काळा पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण सराफांकडे जाऊन सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे संबंधित सराफ आणि खरेदीदार अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. सराफांकडून होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर प्राप्तिकर विभागाने करडी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. याखेरीज सराफांकडे असणारा सोन्याचा साठा आणि झालेली विक्री यांचा लेखाजोखा केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने जमा करण्यास सुरवात केली आहे.

पिंपरी - रोख रकमेत दडवून ठेवलेल्या काळा पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण सराफांकडे जाऊन सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे संबंधित सराफ आणि खरेदीदार अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. सराफांकडून होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर प्राप्तिकर विभागाने करडी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. याखेरीज सराफांकडे असणारा सोन्याचा साठा आणि झालेली विक्री यांचा लेखाजोखा केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने जमा करण्यास सुरवात केली आहे.

सोन्याची खरेदी करताना संबंधित खरेदीदारांना बिल देणे आवश्‍यक आहे; मात्र रोख रकमेच्या माध्यमातून लपवून ठेवलेल्या काळ्या पैशांच्या माध्यमातून पावती न घेता सोने खरेदी केले जात असल्याची चर्चा सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी सराफांची दुकाने गाठली. त्यामुळे एका दिवसात सोन्याच्या दरात चार ते पाच हजार रुपयांनी वाढ झाली. या काळात खरेदी आणि विक्री झालेल्या सोन्या-चांदीचा लेखाजोखा सराफांना संबंधित सरकारी यंत्रणांना द्यावा लागणार आहे.

सध्या सोने किंवा चांदीची खरेदी करण्यासाठी कोणत्याही दुकानात गेल्यास त्या ठिकाणी पॅनकार्ड क्रमांक द्यावा लागतो. पॅनकार्डच्या माध्यमातून कुणी किती रकमेची खरेदी केली, याची सर्व माहिती दररोज प्राप्तिकर खात्याकडे जात असते. बऱ्याचदा काही ठिकाणी पावती न देता सोन्या-चांदीचे व्यवहार केले जातात; मात्र केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडून सोन्या-चांदीवर कर आकारणी सुरू झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पावती देण्यास सुरवात झाली होती. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे बऱ्याच ठिकाणी विनापावतीची सोने-चांदी खरेदी झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

प्राप्तिकर विभागाकडे विविध स्रोतांच्या माध्यमातून बाजारपेठेत होणाऱ्या उलाढालीची माहिती येत असते. पॅनकार्डमुळे कोणताही मोठा व्यवहार शक्‍यतो लपून राहात नाही. आताच्या परिस्थितीत झालेल्या खरेदी-विक्रीची माहिती प्राप्तिकर विभागाकडे येत आहे. येत्या काही दिवसांत त्यांची छाननी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मॉल, शॉपीमध्ये कार्डवर भर...
बॅंकांमध्ये पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा अद्याप उपलब्ध झालेल्या नसल्याने मॉल आणि शॉपीमध्ये डेबिट कार्ड चालवण्यावर नागरिक भर देत आहेत. शनिवारच्या सुटीमुळे मॉल, शॉपीमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रविवारीही गर्दी होण्याची शक्‍यता आहे. छोट्या दुकानांत कार्डद्वारे पैसे घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या व्यक्‍तींकडे कार्ड आहेत, त्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे शहरातील दुकानदारांनी सांगितले.

Web Title: Paisantuna buy gold on black "look praptikaraci