पाकिस्तानी कांद्याबाबत शिवसेनेची बघ्याची भूमिका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मंचर - ‘राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही भागणार नाही. कांदा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनेचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत नाहीत; पण पाकिस्तानातून आयात केलेल्या कांद्याबाबत शिवसेनेने बघ्याची भूमिका घेतलेली आहे,’’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली.

मंचर (ता. आंबेगाव) येथे आज पुणे- नाशिक रस्त्यावर बांगर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले.

राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचा संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकून निषेध केला. बाजार समितीपासून भाजप- शिवसेना सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर सभा झाली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागाचे गजानन पाटील, काळूराम कड, जयप्रकाश परदेशी, यशवंत इंदोरे, वनाजी बांगर यांची या वेळी भाषणे झाली. पंकज पोखरकर यांनी आभार मानले. सभेनंतर महामार्गावर बाजार समितीसमोर कांदे फेकून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

‘...तेव्हा खासदार काय करत होते’
‘‘सरकारने कांदा, बटाट्याचा जीवनावश्‍यक कायद्यात समावेश केला, त्या वेळी या भागातील खासदार काय करत होते? कांदा प्रश्नासाठी त्यांनी कधीही संसदेत आवाज उठवला नाही. भंगार २३ ते २४ रुपये किलोने, तर कांदा दोन रुपये किलोने विकला जातो. कांद्याला प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान मिळाले पाहिजे. तातडीने तोडगा न काढल्यास मंत्र्यांना कांदा फेक आंदोलनास सामोरे जावे लागेल,’’ असा इशारा प्रभाकर बांगर यांनी दिला.  

Web Title: Pakistan Onion Shivsena Swabhimani Shetkari Sanghatana