हडप्पा-मोहेंजोदडो संवर्धनासाठी पाकिस्तानने मागितली भारताकडून मदत 

दिलीप कुऱ्हाडे 
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

जागतिक पुरातत्त्व विभाग त्याचा जागतिक वारसास्थळ काढून घेणार असल्याचे पाकिस्तानला सांगितले आहे. 

पुणे - सिंधु संस्कृतीमधील सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा- मोहेंजोदडो हे जागतिक वारसास्थळाला धोका निर्माण झाला आहे. त्याचे वेळीच संवर्धन केले नाही तर जागतिक पुरातत्त्व विभाग त्याचा जागतिक वारसास्थळ काढून घेणार असल्याचे पाकिस्तानला सांगितले आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पाकिस्तानने भारताकडून विशेषत: डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभागाकडे मदत मागितल्याची माहिती डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली. 

या संदर्भात डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘मोहंजोदडो सध्या पाकिस्तानमधील सिंध सरकारच्या अंतर्गत येतो. नुकतेच सिंध सरकारने हडप्पा-मोहंजोदडो या जागतिक वारसास्थळाच्या संवर्धनासाठी एक परिषद घेतली होती. या परिषेदेत अमेरिका व युरोपमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांसोबत सहभाग होता. भारत व पाकिस्तानचा सांस्कृतिक वारसा एकच आहे. बौद्धिक विचार करण्याची पद्धती सुद्धा समान असल्यामुळे सिंध सरकारने सिंधू संस्कृतिचा मिळून अभ्यास करण्यासाठी साद घातली आहे. सिंधु संस्कृती सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीची असल्यामुळे प्रत्यक्ष वारसास्थावर जाऊन संशोधन केल्यास मानवी इतिहासावर नवीन प्रकाश पडण्याची शक्यता आहे.’’ 

Hadappa Mohenjodado

भारत व पासिक्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तान सरकारने हडप्पा-मोहंजोदडो स्थळाकडे लक्षच दिले नाही. याठिकाणी अमेरिका व युरोपमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी संशोधन व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संवर्धन करताना त्यांनी युरोपियन हवामानाचा विचार केला. मात्र ही पद्धती सिंध मधील वातावरणाला अनुकूल नसल्यामुळे वारसास्थळावरील विटांचा भुगा झाला.स्थानिक लोकांनी संवर्धनासाठी मातीमध्ये सुकलेले गवत,पालापाचोळ्याचा लेप देण्याची सुचना केली आहे. हे तंत्र वापरल्यास किमान दहा वर्षे वारसास्थळाचे संवर्धन होईल, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

फाळणीच्या काही वर्षांनंतर पाकिस्तानने मोहंजोदडो पेक्षा मोठ्या अशा ‘लखिनजोदडो’ या स्थळाचे उत्खनन केले. मात्र सरकारची उदासिनता, पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा अभाव त्यामुळे त्या स्थळाचे संशोधन झाले नाही. दुर्देवाची बाब म्हणजे उत्खननात निघालेल्या मातीवर विटा तयार करणाऱ्या भट्ट्या उभ्या राहिल्या आहेत असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

हडप्पा व मोहेंजोदडोचे उत्खनन पुणेकरांकडून -
ब्रिटीशकाळात 1920मध्ये हडप्पा- मोहेंजोदडोचे उत्खनन झाले होते. त्यावेळी सिंध प्रांत मुंबई इलाख्यात होता. तर पुरातत्त्व विभागाचे कार्यालय त्यावेळी पुण्यात होते. त्यामुळे मोहेंजोदडोचे उत्खनन पुण्यातील लोकांनी केल्याची आठवण डॉ. वसंत शिंदे यांनी सांगितली.

Hadappa Mohenjodado

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Pakistan sought help from India for the Harappa Mohenjodaro conservation